Join us

Cotton Farming Success Story : कपाशी पिकांत आधुनिक पॅटर्नचा वापर; झाडांच्या उंचीसह उत्पन्नात झाली तीन पट वाढ

By रविंद्र जाधव | Updated: November 27, 2024 12:42 IST

आजकाल शेतकऱ्यांना (Farmers) केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहणे पुरेसं नाही त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा वापर करणे देखील आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारेगाव (ता. फुलंब्री) येथील प्रभाकर जाधव (Prabhakar Jadhav) होय. ज्यांनी आपल्या शेतीत आधुनिक पद्धतींचा (Modern Technology) वापर करून त्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे.

शेतीत वेळेनुसार बदल करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यामुळे शेतीतून हमखास अधिक उत्पन्न मिळवता येते. आजकाल शेतकऱ्यांना केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहणे पुरेसं नाही त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक पद्धतींचा वापर करणे देखील आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारेगाव (Waregaon Tq. Phulambari) (ता. फुलंब्री) येथील प्रभाकर जाधव होय. ज्यांनी आपल्या शेतीत आधुनिक पद्धतींचा वापर करून त्याच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारेगाव (ता. फुलंब्री) येथील प्रभाकर गोविंदराव जाधव यांना वडीलोपार्जित ७ एकर क्षेत्र आहे. त्यात यंदा २ एकर कपाशी, २ एकर गहू, १.५ एकर ड्रॅगन फ्रूट, तर उर्वरित क्षेत्रात २० गुंठे शेततळे आणि आले पीक आहे.

गेल्या दहा वर्षांपासून प्रभाकर हे यवतमाळ येथील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी विकसित केलेल्या 'अमृत पॅटर्न' पद्धतीने शेती करतात. ज्यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक पॅटर्नची जोड दिल्याने उत्पन्नात वाढ होऊन खर्च कमी झाला आहे. सध्या ७ बाय १ - ५ बाय १ या पट्टा पद्धतीत प्रभाकर यांनी कपाशीची लागवड केली असून एकरी सरासरी २५-३० क्विंटल कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे. तर लागवड, खते, तार-बांबू बांधणी, वेचणी, कीड रोग व्यवस्थापन आदींवर ४० ते ५० हजार रुपये खर्च होत असल्याचे प्रभाकर सांगतात.

खत व्यवस्थापन

सुरुवातीला नांगरणी करून एक महिना जमीनीला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर मोगड्याद्वारे शेत मोकळे करून त्यावर रोटावेटर चालवण्यात आला. पुढे ठिबक प्रणाली पसरवून कपाशीची लागवड करण्यात आली. ज्यासाठी सुरुवातीला ॲझोटोबॅक्टर, केएसबी-पीएसबी, ट्रायकोडर्मा आदींच्या प्रक्रियेद्वारे एकरी एक ट्रॉली शेणखत दिले गेले. त्यामुळे लागवडीच्या पश्चात ३० दिवस कोणतेही खत देण्याची गरज पडली नाही.

जिथून पुढे ३५ व्या दिवशी पहिला रासायनिक खताचा डोस १०-२६-२६ एकरी १ बॅग व १० किलो सल्फर पुढे दर पंधरा दिवसांनी एकरी एक बॅग १०-२६-२६ तर केवळ तिसऱ्या बॅग बरोबर एकरी २५ किलो मॅग्नेशियम असे पाच पाच डोस. त्यानंतर साधारण ९०-१०५ दिवसादरम्यान एकदाच एकरी ३ बॅग युरिया. तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेता वेळेनुसार रासायनिक कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी. 

कष्ट एकपट तर उत्पन्न तीनपट वाढले

पारंपरिक कपाशी पिकापेक्षा अमृत पॅटर्नमध्ये कष्ट अधिक आहेत. ज्यात झाडांना बांबूच्या मदतीने तार बांधावी लागते. मात्र हे कष्ट वाढले तरी उत्पन्न देखील तीनपट वाढले आहे. परिसरातील एकरी ५ ते ७ क्विंटल कापसाचे उत्पादन होत असताना आमच्या शेतात एकरी २५ क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे प्रभाकर सांगतात.

पारंपरिक शेतीत बदल करणे काळाची गरज

शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीत वेळोवेळी काळानुसार बदल स्वीकारणे आवश्यक आहे. त्यामुळे कर्जात बुडलेला शेतकऱ्याचा प्रतिमाही बदलून तो सुखी होईल. - प्रभाकर गोविंदराव जाधव.

हेही वाचा : Women Farmer Poultry Success Story : पारंपरिक शेतीला जोडधंदाची साथ; कुक्कुटपालनातून त्रिवेणा ताईंची आर्थिक अडचणींवर मात

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीकापूसछत्रपती संभाजीनगरमराठवाडापीक व्यवस्थापन