मेहरून नाकाडेरत्नागिरी : नोकरी करत असताना शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देता येत नव्हते, मात्र सेवानिवृत्तीनंतर गेली तीन वर्षे शंकर कुळ्ये पूर्ण वेळ देत बारमाही शेती करत आहेत. विशेष म्हणजे पावसाचे पाणी तळ्यात साठवून त्याचा वापर ते शेतीसाठी करत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील शंकर गोविंद कुळ्ये कोकण रेल्वेत ट्रॅकमन पदाची सेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता ते पूर्ण वेळ शेती करत आहेत.
पावसाळी भात, भेंडी, मिरचीची लागवड करतात. भात काढल्यानंतर त्यामध्ये मुळा, माठ, मेथी या पालेभाज्यांची लागवड करतात. त्याशिवाय चवळी, मटार, पावटा, तूर लागवडही करतात. काही क्षेत्रावर झेंडू लागवड करतात.
यावर्षी कलिंगड लागवड करण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे शंकर यांचा मुलगा प्रणय याला शेतीची आवड असून तो वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत आहे. केवळ शेतातच नाही तर शेतमाल विक्रीसाठी प्रणयची मदत त्यांना होत आहे.
शंकर यांच्या आजोबांनी पूर्वी दगड काढण्यासाठी आपली जागा दुसऱ्याला दिली होती, त्यामुळे दगड काढून तयार झालेल्या खणीत पावसाचे पाणी शंकर साठवत आहेत.
त्यासाठी त्या खणीचे आरसीसी पद्धतीने पिलर टाकून बांधकाम केले आहे. या पाण्यावर त्यांना शेती करणे सुलभ होत आहे. मे महिन्यात मात्र पाणी पुरत नाही. त्यामुळे एप्रिलपर्यंत ते विविध प्रकारची पिके घेतात.
बियाणे खरेदीपासून लागवड, पाणी, खत व्यवस्थापन, काढणी, विक्रीपर्यंत शंकर स्वतः देखरेख ठेवतात. प्रणयसोबत असतो, शिवाय दोन मजुरांना त्यांच्याकडे कायमस्वरूपी काम मिळाले आहे.
शेतीच्या कामासाठी यांत्रिक अवजारांचा वापर करीत असून त्यामुळे वेळ, श्रम, पैशाची बचत होते. शेतीतून फारसा पैसा मिळत नसला तरी मिळणारे समाधान मोठे असल्याचे सांगितले.
प्लास्टिक मल्चिंगचा वापर◼️ शेतातील तण/रान काढणे हे फार खर्चिक व डोकेदुखीचे काम आहे. यावर पर्याय म्हणून जमिनीची नांगरणी करून वाफे तयार केले जातात, त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपरचे आच्छादन केले जाते.◼️ त्यामुळे रान/तण उगवत नाही, शिवाय आवश्यक पाणी, खताची मात्रा असेल तर पिकाची वाढ जोमाने होत असल्याचे सांगून तण काढण्याचे पैसेही वाचत असल्याचे सांगितले.
भाजीपाला लागवडीवर भर◼️ पालेभाज्या, भेंडी, मटार, वालीच्या शेंगा, मका, पावटा, वांगी, चवळी, तूर लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीवर विशेष भर आहे. भाजीपाल्यासाठी स्थानिक बाजारात मागणी आहे.◼️ शिवाय पंचक्रोशीतील आठवडा बाजारातही सहज विक्री होते. तीन महिन्यात येणारी पिके ते घेत आहेत. पावसाळी मिरची लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले आहे.
कंपोस्ट खत निर्मिती, वापर◼️ पालापाचोळा, शेण एकत्र करून त्यापासून शंकर कंपोस्ट खत तयार करतात. त्याचाच वापर ते शेतीसाठी करत आहेत.◼️ रासायनिक खताचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे पिकाचा दर्जा व उत्पादन चांगले मिळत असल्याचे सांगितले.◼️ खण पक्की बांधल्यामुळे पावसाचे पाणी साचवून त्याचा वापर शेतीसाठी करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे पावसाळीच नाही तर ११ महिने शेती करणे शक्य झाले आहे.◼️ भात कापणी पुढच्या महिन्यात झाल्यानंतर पालेभाज्यांची लागवड ते करणार आहेत.
अधिक वाचा: सह्याद्रीच्या कुशीत रानभाज्यांचा खजिना; यातूनच सुरु झाला महिला स्वयंरोजगाराचा प्रवास