Join us

आठ वेळा अपयशानंतर अखेर 'अलका'ने गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याची कन्या झाली क्लास वन ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:57 IST

farmer daughter mpsc exam success प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली अलका मारुती खोत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत वाडीचे नाव राज्यभर उंचावले आहे.

बाबासाहेब परीटबिळाशी : शिराळा तालुक्यातील दुरंदेवाडी-बिळाशी येथील डोंगर पायथ्यावरील पन्नास उंबऱ्यांची वाडी, जिथे पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते पायपीट, चौथीपलीकडे शाळा नाही आणि रोजचं जीवन म्हणजे संघर्ष.

अशा प्रतिकूल परिस्थितीतून उभी राहिलेली अलका मारुती खोत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत वाडीचे नाव राज्यभर उंचावले आहे.

अलका हिचं यश म्हणजे केवळ तिचं नाही, तर शेतकरी कुटुंबाच्या जिद्दीचं मेहनतीचं आणि प्रतीक आहे. जिथे बहुतांश महिला रोजंदारीसाठी खुरपं घेऊन शेतात जातात, त्याच वाडीतील ही मुलगी आता अधिकारी बनली आहे.

या यशामुळे बिळाशी परिसरात अभिमान आणि आनंदाचं वातावरण आहे. अलकाचे वडील मारुती खोत हे शेतकरी असून, आई शेतीची आणि घरची जबाबदारी सांभाळते.

तिचा भाऊ अक्षय याने बहिणीचं शिक्षण सुरू राहावं म्हणून स्वतःचं शिक्षण थांबवून मुंबईतील कपडा मार्केटमध्ये नोकरी केली. आई-वडिलांनी कोरडवाहू शेती करत मुलांना शिकवलं आणि शेवटी या मेहनतीचं सोनं झालं.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात संघर्ष पाचवीला पूजलेला आहे. अपयश आल्यावर निराश न होता सातत्य ठेवणं हेच माझं बळ ठरलं. आठ वेळा अपयश आलं तरी जिद्द सोडली नाही.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यायचं असेल तर 'शेंडी तुटो पारंबी तुटो' या भूमिकेतून यायला लागतं. तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा किती चिकाटी ठेवू शकता हे महत्त्वाचं आहे, असेही अलका खोत हिने बोलताना सांगितले.

अलकाचं प्राथमिक शिक्षण दुरंदेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण वारणा प्रसाद विद्यालय बिळाशी, उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिराळा आणि महाविद्यालयीन शिक्षण चिखली येथे झाले.

अलका खोत हिच्या यशामुळे शेतकरी मारुती खोत यांच्या घरात आणि एकूणच तिच्या गावात दिवाळीनंतर यशाची 'दिवाळी' उजळली आहे.

अधिक वाचा: बाजार कोसळलेल्या 'केळी'वर प्रक्रिया करून थेट विक्री; दोन एकरातून सव्वातीन लाखांची कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Persistence pays off: Farmer's daughter becomes Class One officer after failures.

Web Summary : Alka Khot, from a humble farming background, achieved success in the MPSC exam after eight attempts. Her brother sacrificed his education to support her dream. Her success is a testament to her family's dedication and perseverance, bringing joy to her village.
टॅग्स :शेतकरीशेतीमहिलाएमपीएससी परीक्षामहाराष्ट्रसांगलीशिक्षण