Join us

जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फयद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

By रविंद्र जाधव | Updated: May 25, 2025 16:17 IST

Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे.

पारंपरिक शेतीला फाटा देत चार हजार लोकसंख्या असलेल्या अमोदे (ता. नांदगाव) येथील तरुण शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून आपल्या स्वप्नांना नवी दिशा दिली आहे.

'डी.एड.'चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुटपुंज्या पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवत निवृत्ती यांनी आपल्या वडिलोपार्जित आठ एकर शेतीकडे लक्ष दिलं. मन्याड धरण आणि गिरणा नदीच्या हाकेच्या अंतरावर तर खान्देशच्या सीमेवर वसलेल्या नाशिक जिल्ह्याच्या अमोदे (ता. नांदगाव) येथील आपल्या शेतात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतीत नवे प्रयोग सुरू केले. ज्यामुळे आज प्रगतीचा आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग आपल्या मेहनतीने त्यांनी उभारला आहे.

सध्या पगार यांच्याकडे अडीच एकर क्षेत्रात ‘ओडिसी’ जातीच्या शेवग्याची १२ बाय ९ फूट अंतरावर लागवड करण्यात आली आहे. तर दीड एकर क्षेत्रात १२ बाय १० अंतरावर २०२२ मध्ये ‘भगवा-शेंद्रा’ जातीचे डाळिंब घेतले आहे. याशिवाय २० गुंठे टोमॅटो आणि एक एकरात १५ नंबर वाणाच्या पपईची देखील लागवड आहे. उर्वरित क्षेत्रापैकी अर्ध्या एकरावर कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट उभारण्यात आले असून त्यामध्ये शिमला मिरची, काकडी, झेंडू आदींची आधुनिक पद्धतीने शेती केली जाते.

याशिवाय १-२ एकर क्षेत्रावर निवृत्तीराव खरिपात कपाशी, मका, तर उन्हाळी कांद्याचे पीक घेतात. ज्यात कांद्याचे सरासरी १५० क्विंटलहून अधिक उत्पादन त्यांना मिळते. ते अधिकाधिक जैविक पद्धतींचा वापर करतात. ज्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत असून त्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळत आहे. यंदा १.५ टन डाळिंब निवृत्ती यांनी विक्रीसाठी थेट कोलकत्त्याला पाठवल्याचे देखील ते आवर्जून सांगतात. याशिवाय अजून ८-१० टन डाळिंब उत्पादन बाकी आहे.

शेतीच्या या प्रवासात त्यांना पत्नी पल्लवी यांची देखील मोठी साथ मिळते तसेच शेतीकामासाठी गरजेनुसार ते परिसरातील मजुरांची देखील मदत घेतात. यामुळे कामे जलद होत असून विविध पिकांच्या एकात्मिक धोरणामुळे निवृत्ती यांना आज साधारण ८-१० लाखांचे वार्षिक उत्पन्न शेतीतून मिळत आहे. तसेच २०२४-२५ वर्षाकरिता निवृत्ती यांना कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने देखील गौरविलेले आहे हेही विशेष.

पीक फेरपालट ठरली फायद्याची

गेल्या वर्षी २०२४ मध्ये दिवाळी-दसऱ्याच्या तोंडावर शेडनेटमध्ये पीक फेरपालट म्हणून घेतलेल्या झेंडूचे चांगले उत्पादन हाती आल्याने त्यातून चांगले अर्थजन निवृत्ती यांना मिळाले होते. ज्यात जागेवर व्यापाऱ्यांना ६० रुपये किलो तर हातविक्रीमध्ये १०० रुपये किलो दर मिळाला होता. ज्यामुळे झेंडूने अल्पावधीत खर्च वजा जाता अर्ध्या एकरात २ ते २.५ लाखांचे उत्पन्न निवृत्ती यांना दिले.

मालेगाव, चाळीसगाव बाजारपेठ वरदान

२०-२५ किमी अंतरावर असलेल्या मालेगाव (जि. नाशिक), चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बाजारपेठांमुळे निवृत्ती यांना चांगलाच फायदा होत असल्याचे ते सांगतात. शेवगा आणि शिमल्याची या बाजारात चांगली मागणी असल्याने दर देखील चांगले मिळतात. तसेच अधिक प्रमाणावर शेतमाल असल्यास वाशी (जि. पनवेल) बाजारात देखील शेतमालाची विक्री करत असल्याचेही ते सांगतात.

आंतरपीक आणि खर्च बचत ठरत आहे फायद्याचे

शेवगा बागेत भेंडी आणि मिरचीचे आंतरपीक घेत अधिकचे उत्पन्न निवृत्ती घेतात. तसेच त्यांनी टोमॅटो पिकाच्या आधी त्या क्षेत्रात असलेल्या गिलक्याचे अवशेष तसेच ठेवत त्याच मल्चिंगवर टोमॅटोची लागवड केली ज्यामुळे मल्चिंगच्या खर्चात बचत झाली. तर गिलक्याच्या अवशेषांमुळे टोमॅटोवर सावली मिळाली परिणामी पीक व्यवस्थापन खर्चात बचत झाली.

मुबलक सिंचन व्यवस्था असल्याने नोकरीत रस नाही!

गिरणा आणि मन्याडमुळे आमच्या परिसरात शेतशिवार समृद्ध झाले आहे. पुरेशी सिंचन व्यवस्था असल्याने उन्हाळी हंगामात देखील बागायती पिके घेता येतात. आजकाल १५-२० हजारांची नोकरी करण्यापेक्षा पाणी असल्याने शेती परवडते. - निवृत्ती पुंडलिक पगार.

हेही वाचा : तीन महिन्यांत तीन लाखांचा नफा; संभाजीरावांच्या कारल्याच्या आधुनिक शेतीची यशोगाथा

टॅग्स :शेतकरी यशोगाथाशेतकरीशेतीभाज्याबाजारशेती क्षेत्रगिरणा नदीनाशिकजळगाव