Join us
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार फूट सरी ठेवून ८६०३२ उसाची लागवड; उत्पादनात एकरी १६० टनाची मजल मारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:41 IST

86032 sugarcane farming वैद्यकीय व्यवसाय सांभाळत शेतीत आधुनिकतेचा प्रभावी वापर करून ओतूर येथील शेतकरी डॉ. मनीष अरुण वोरा यांनी उसाच्या उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

महेश घोलपओतूर: वैद्यकीय व्यवसाय सांभाळत शेतीत आधुनिकतेचा प्रभावी वापर करून ओतूर येथील शेतकरी डॉ. मनीष अरुण वोरा यांनी उसाच्या उत्पादनात उल्लेखनीय यश मिळवले आहे.

नियोजनबद्ध शेती, शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब आणि काटेकोर व्यवस्थापन यांच्या जोरावर त्यांनी अल्प क्षेत्रातही भरघोस उत्पादन साध्य केले असून ते परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.

डॉ. वोरा यांनी ८६०३२ या सुधारित जातीचा ऊस अडीच एकर क्षेत्रात लागवड केला आहे. साडेचार फूट सरी व पावणे दोन फूट अंतर ठेवून लागवड केल्यामुळे पिकाच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाले आहे.

वाढीच्या टप्प्यानुसार सरीआड ५ ते ७ दिवसांनी पाट पाणी देऊन सिंचन करून जमिनीतील ओलावा संतुलित राखला जात आहे.

आधुनिक शेती तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी ‘युट्युब’सारख्या माध्यमांचा प्रभावी वापर केला. त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रत्यक्ष शेतात अवलंब करून त्यांनी पिकाची गुणवत्ता वाढवली आहे.

सध्या आठ महिन्यांचा ऊस तयार असून प्रत्येक उसाला सरासरी १४ ते १५ कांड्या आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत हा आकडा २० कांड्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

माती परीक्षण करून बेसल डोस म्हणून कृषी अमृत व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला. लागवडीनंतर २० व ४० व्या दिवशी ड्रेचिंग केल्याने पिकाची वाढ अधिक सक्षम झाली.

त्यानंतर दर महिन्याला पाठपाण्याद्वारे ड्रमच्या सहाय्याने युरिया, १२:३२:१६ व पोटॅश यांचा संतुलित वापर करण्यात आला. या सर्व नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे प्रति एकर सुमारे १६० टन उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, हा ऊस बियाणे म्हणूनही गुणवत्तापूर्ण ठरत असून परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याला मागणी वाढत आहे.

चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला देण्याऐवजी बियाणे म्हणून विक्री करून इतर शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा मानस डॉ. वोरा यांनी व्यक्त केला.

त्यांनी टिशू कल्चरची फर्स्ट स्टेज रोपे वापरली असून त्यामुळे उसाची वाढ, कांड्यांमधील अंतर आणि जाडी वाढल्याचे दिसून आले आहे. ही रोपे सेकंड स्टेजसाठी रोगमुक्त व अधिक उत्पादनक्षम बियाणे म्हणून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

डॉ. वोरा यांच्या या प्रयोगातून आधुनिक व शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब केल्यास उसामध्ये भरघोस उत्पादन मिळवणे शक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा: तब्बल २० वर्षानंतर राज्य महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल; ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी

English
हिंदी सारांश
Web Title : Sugarcane Farmer Achieves 160 Tons/Acre with Innovative Planting.

Web Summary : Doctor Manish Vora achieved sugarcane success using modern techniques. Planting 86032 variety sugarcane with specific spacing, he expects 160 tons per acre. He uses YouTube for guidance and sells quality seeds.
टॅग्स :शेतीशेतकरीपीकऊसलागवड, मशागतपीक व्यवस्थापनसाखर कारखानेखतेयु ट्यूब