जगन्नाथ कुंभार
मसूर किवळ, ता. कराड येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी अवघ्या २७ गुंठ्यांत उसाचे ८१ टन उत्पादन घेतले. त्याचबरोबर २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न घेऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ही निर्माण केला.
किवळ येथील शेतकरी राम धरणे यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून त्यामध्ये चार टेलर शेणखत, १२ टन मळी विस्कटून पुन्हा रोटर मारून साडेचार फुटी सरी सोडली.
त्यामध्ये बीजप्रक्रिया करून ८६०३२ वाणाच्या उसाची कांडी लागण केली. ऊस लागण केल्याच्या दहाव्या दिवशी पहिली अळवणी आणि पुढे दहा दिवसाच्या अंतराने तीन आळवणी घातली.
दीड महिन्यानंतर बाळ भरणी करताना २०:२०:०, यूरिया, ह्युमिक अॅसिड १० किलो, एकरी दोन पोती याप्रमाणे रासायनिक खत टाकले.
९० व्या दिवशी २ पोती यूरिया, २ पोती पोटॅश, २ पोती डीएपी, २ पोती निंबोळी, २ पोती सिलिकॉन, २ पोती ऊस स्पेशल, कॉम्बिकीट ५५ किलो, २ पोती अमोनियम सल्फेट, २ पोती सेकंडरी, २ पोती झाइम बकेट टाकून छोट्या ट्रॅक्टरने मोठी भर केली.
सर्व क्षेत्रात ठिबकच्या साह्याने पाणी दिले. उसाचा पाला ११० दिवसानंतर काढून विरळणी केली. मे महिन्यात पावसाळी डोस २ पोती अमोनियम सल्फेट, २ पोती एमओपी, २ पोती डीएपी असा डोस दिला. ५ डिसेंबरला रोजी कारखान्याला ऊस गेला.
नऊ वर्षांपासून ऊस शेतीच...
◼️ राम धरणे हे पूर्वी द्राक्ष शेती करत होते. परंतु नऊ वर्षापासून ते उसाशिवाय दूसरे कोणतेही पीक घेत नाहीत.
◼️ धरणे स्वतः बीएससी झालेले उच्चशिक्षित असून ते मसूर येथे ऋतू अॅग्रो केमिकल फर्म चालवतात.
◼️ त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली ऊस शेती करून एवढे उत्पन्न घेतले आहे.
ऊस शेती करत असताना लागण केल्यावर सुरुवातीला चार महिने शेतीकडे बारकाईने लक्ष दिले. तसेच वेळच्या वेळी कामे केली तर अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मदत होते. आपली आर्थिक प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. - राम धरणे, प्रगतशील शेतकरी, किवळ
अधिक वाचा: मंगळवेढ्याची मालदांडी थेट लंडनला रवाना; अवघ्या २० किलो ज्वारीसाठी केले १८ हजार रुपये खर्च
