जगन्नाथ कुंभार
मसूर कवठे, ता. कराड येथील प्रगतशील शेतकरी आण्णाजी सयाजीराव यादव यांचे ऊस क्षेत्र असून त्यांनी अवघ्या सव्वा एकरात १६० टन उत्पादन मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
यामधून त्यांना ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. तसेच सध्याचे पीक पाहता त्यांनी इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
कवठे येथील शेतकरी आण्णाजी यादव यांनी उसाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला शेतीत पाचटकुटी करून नांगरट केली. त्यानंतर रोटर मारून चार फूट सरी सोडली.
मधली एक सरी सोडून दोन्ही बाजूच्या सरीवर ८६०३२ रोपांची लागण केली. लागण केल्यानंतर आठव्या दिवशी आणि तीन आठवड्यानंतर अशा दोन आळवणी दिल्या. उसाला पहिली भर ८८ दिवसांनी केली.
यावेळी मधली सरी बुजवून ताग टोकला. तो ताग ४८ दिवसानंतर कापून उसाकडेला टाकला. यावेळी रासायनिक आणि ७५ पोती कोंबडी खत टाकून पावर टिलरने भर दिली. भर घातल्यावर ट्रॅक्टरने बेड सोडले.
त्यानंतर दोन्ही बाजूला ठिबक अंथरले. या ठिबकमधूनच कीटकनाशक आरसीएफची औषधे, बॅक्टेरिया जीवामृत सोडले. सव्वा एकरात २०० लिटर जीवामृत सोडले.
येथून पुढे आता ऊस कारखान्याला जाईपर्यंत अमोनिया सल्फेट आणि पोटॅश १५ दिवसांतून एकदा सोडण्यात येणार आहे. या प्रयोगामुळे सव्वा एकरात उसाचे १६० टन उत्पादन निघेल असा अंदाज आहे.
तर ऊस कारखान्याला जाईपर्यंत १ लाख २० हजार रुपये खर्च येईल. खर्च वजा जाता १७ महिन्यांत ४ लाख ४० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.
तर सद्यस्थितीला सर्व ऊस हा १८ ते २० कांड्यावर आलेला आहे. या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
शेतकऱ्याने धरली आधुनिकतेची कास
कवठे येथील या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली आहे. यासाठी ठिबक सिंचन करुन कमीत कमी पाण्यावर शेती करण्यासाठी प्रयोग केला अन् तो यशस्वीही केला आहे.
शेती करत असताना शेतीविषयकची अनेक मासिके वाचली आहेत. एकदा वाचनात आठ फुटी सरीवर ऊस चांगला येतो असे वाचले होते. त्याचा प्रयोग म्हणून आणि निर्धार करून आठ फुटी सरीवर ऊस लागण केली आहे. यामधून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. शेतकरी बांधवांनीही असेच वेगवेगळे प्रयोग करावे व आपला आर्थिक स्त्रोत वाढवावा. - आण्णाजी यादव, शेतकरी, कवठे
अधिक वाचा: उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी पडतंय? तुमच्या शेतात 'हा' एकच खड्डा काढा, मुरेल साडेतीन लाख लिटर पाणी
