पीक पैदासकारांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यांपर्यंत आणि चांगल्या स्थितीत पोहोचावे, यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यांत घेतले जाते.
बियाण्याचे प्रकार व बियाण्याच्या बॅगवरील खूणचिठ्ठी (टॅग)
१) मूलभूत/पैदासकार बियाणे
- या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता १०० टक्के असते.
- हे बियाणे त्या पीक पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते.
- हे बियाणे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते.
- मूलभूत/पैदासकार बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावलेली असते.
२) पायाभूत बियाणे
- हे बियाणे तयार करण्यासाठी मूलभूत बियाणे वापरले जाते.
- पायाभूत बियाण्यांच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावलेला असतो.
३) प्रमाणित बियाणे
- हे पायाभूत बियाण्यांपासून तयार केले जाते.
- प्रमाणित बियाणे हे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतावर प्रमाणीकरण एजन्सीच्या मान्यतेनुसार व देखरेखीखाली उत्पादित केले जाते.
- या बियाण्याच्या पिशवीला निळ्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावलेला असतो.
४) सत्यप्रत बियाणे
- यासाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर करतात.
- बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे हे बियाणे आहे.
- हे बियाणे शेतकरी शेतावर तयार करू शकतात.
- मात्र या बियाण्यांची अनुवांशिक शुद्धता चांगली असणे गरजेचे आहे.
- सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाची खूणचिठ्ठी (टॅग) लावलेला असतो.
टॅगवर खुलासा असावा
◼️ अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतीच्या कमीत कमी मूल्याचा दर्जा दाखवणारा माहिती टॅग असणे आवश्यक आहे.
◼️ त्यावर पुढील माहिती असणे आवश्यक आहे. पिकाचे नाव, जाती व प्रकार, टॅग क्रमांक, लॉट नंबर, बीज परीक्षणाचा दिनांक, पॅकिंग दिनांक, अंतिम दिनांक, उगवण शक्ती टक्के, अनुवांशिक शुद्धता, भौतिक शुद्धता, पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?