कपाशीवरील बोंड अळीच्या पतंगाची मादी नराला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा गंध सोडते. असा गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्याच्या स्वरूपात (ल्यूर) वापरला जातो. त्या प्लास्टिकच्या सापळ्यात पतंग अडकतात व याद्वारे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळविता येते.
पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यामध्ये मशागत, कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक, भौतिक, जैविक पद्धतींचा संयुक्तिक वापर केला जातो.
किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करणे महत्त्वाचे आहे. कीटकनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो.
कामगंध सापळा म्हणजे काय ?
कापसावरील बोंड अळ्यांचा मादी पतंग विशिष्ट प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात, नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात. असे गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्यांच्या स्वरूपात सापळ्यात वापरले जातात. या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात, त्या प्लास्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात.
गंधामुळे विजातीय पतंग सापळ्यात जातात आकर्षिले
पतंगवर्गीय कीटकांमध्ये मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडला जातो. काही कीटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते, तर काहींमध्ये मादीद्वारे नराला आकषून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते. अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात.
कीड नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर केल्यास रासायनिक कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च कमी होतो. किडींची संख्या कमी असतानाच याद्वारे पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येते. - वरुण देशमुख, उपसंचालक, कृषी, अमरावती.