सातबारा उताऱ्यावर इतर हक्कांची नोंद अनेक कारणांनी होते. उदाहरणार्थ मालकाने शेती करण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीस दिला असल्यास, जमीन गहाण ठेवली असल्यास, वडिलोपार्जित किंवा वारसाहक्कामुळे, कोर्टाने आदेश दिल्यास किंवा करारांद्वारे हक्क निर्माण झाले असल्यास.
अशा हक्कांची नावे सातबाऱ्यावरून कमी करायची असल्यास त्या व्यक्तीची लेखी संमती आवश्यक असते. हक्कधारकाने मुद्रांकावर प्रमाणित लेखी संमतीपत्र लिहून दिल्यास, त्याआधारे नोंद कमी केली जाऊ शकते.
जर व्यवहार पूर्ण झाला असेल, कराराचा कालावधी संपला असेल, कर्ज फेडले गेले असेल किंवा शेतीचा करार रद्द झाला असेल, तर जमीनधारक व हक्कधारक यांच्यात स्टॅम्प पेपरवर 'हक्क संपले आहेत', असे स्पष्ट नमूद करावे.
त्याची प्रत, संमतीपत्र, सध्याचा सातबारा, ८-अ उतारा, आधार कार्ड, फोटो व सहीसह अर्ज तलाठी किंवा मंडल अधिकाऱ्याकडे सादर करावा.
तलाठी हा अर्ज प्राप्त झाल्यावर कागदपत्रे तपासून फेरफार नोंद घेतो आणि चौकशीसाठी मंडल अधिकाऱ्याकडे पाठवतो. चौकशीनंतर मंडल अधिकारी किंवा तहसीलदार हे फेरफार मंजूर करतात.
मंजुरीनंतर सातबारा उताऱ्यावरून इतर हक्कातील संबंधित नावे काढून टाकली जातात आणि नवीन उताऱ्यावर त्या नोंदी दिसत नाहीत.
सर्व कागदपत्रे व्यवस्थित असल्यास साधारण महिना-दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, मात्र न्यायालयीन प्रकरणात जास्त वेळ लागतो.
इतर हक्कातील नावे कमी करणे ही एक गंभीर आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यासाठी अनुभवी वकिलाचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर