Join us

यंदा कांदा रोपांची रोगमुक्त वाढ हवीय? मग 'हा' नैसर्गिक उपाय आवर्जून करा

By रविंद्र जाधव | Updated: September 14, 2025 17:24 IST

कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञांनी कांदा रोपवाटिकेत जैविक घटकांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

विशेषतः कांद्याची रोपवाटिका तयार करत असताना बियाणे टाकल्यानंतर गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले शेणखत याचा एक अत्यंत हलका थर वरून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा थर धूळफेक पेरणी केलेल्या बियांवर दिल्यास, मातीतील ओल टिकते तसेच बी उगमाची प्रक्रिया जलद व सुलभ होते.

मात्र केवळ खताचा थर पुरेसा नाही. त्यात ट्रायकोडर्मा विरिडी आणि पीएसबी (Phosphate Solubilizing Bacteria) हे जैविक घटक मिसळल्यास कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी होतो. ट्रायकोडर्मा हे जमिनीतील हानिकारक बुरशीवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण ठेवते. त्याचा वापर केल्यास डंपिंग ऑफ, रूट रॉट यांसारख्या बुरशीजन्य आजारांपासून रोपांचं संरक्षण होतं.

त्याचप्रमाणे पीएसबीचा वापर केल्याने जमिनीत उपलब्ध असलेला अघुलनशील स्फुरद विद्राव्य स्वरूपात रोपांना मिळतो. त्यामुळे मुळे मजबूत होतात आणि रोपांची वाढ अधिक सशक्त होते. हे जैविक घटक शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून रोपवाटिकेत वापरल्यास कांद्याच्या आरोग्यदायी रोपांची निर्मिती होऊ शकते.

दरम्यान खताचा थर अतिशय हलका असावा. जाडसर थर दिल्यास बी अंकुरण्यास अडथळा निर्माण होतो व कधी कधी बी कुजण्याची शक्यताही निर्माण होते. त्यामुळे खताची मात्रा नियंत्रित ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. कांद्याच्या लागवडीचा पाया रोपवाटिकेतच घातला जातो. त्यामुळे या टप्प्यावर केलेले व्यवस्थापन पुढील उत्पादनावर थेट परिणाम करतं. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांऐवजी अशा जैविक पर्यायांचा अवलंब करणे गरजेचे ठरत आहे.

हेही वाचा : गवतात आढळणारा 'हा' किडा चावल्याने होतो स्क्रब टायफस आजार; वेळीच लक्ष न दिल्यास ठरू शकतो प्राणघातक

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणकांदापीक व्यवस्थापनलागवड, मशागतपेरणीशेतकरीशेतीशेती क्षेत्र