वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेल्या तुरीच्या बीडीएनपीएच-२०१८-०५ या संकरित वाणास केंद्र शासनाकडून अधिकृत अधिसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण असून, भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. S.O. 6123(E), दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अन्वये बीडीएनपीएच-२०१८-०५ या वाणास अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले आहे.
हा वाण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांसाठी शिफारसीत करण्यात आला असून, कोरडवाहू तसेच सिंचित परिस्थितीत लागवडीस योग्य आहेत.
यानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या कडधान्य उत्पादन मोहिमेसाठी नुकताच अधिसूचित करण्यात आलेला तुरीचा संकरित वाण बिडिएनपीएच १८-०५ हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.
या वाणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भरीव आर्थिक उन्नती साधता येईल. तसेच हा वाण कोरडवाहू तसेच बदलत्या हवामानाच्या परिस्थितीतही उपयुक्त ठरेल.
विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने तुरीच्या गोदावरी या वाणापासून शेतकऱ्यांनी कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल तर ठिबक सिंचनाखाली लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले आहे.
गोदावरी वाणामुळे शेतकऱ्यांना साधारणपणे एकरी एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी विद्यापीठाद्वारे विकसित तुरीच्या गोदावरी वाणाकडे ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत.
याचप्रमाणे बिडिएनपीएच २०१८-०५ हा संकरित वाणही शेतकऱ्यांसाठी तितकाच लाभदायक ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, या नवीन वाणाच्या प्रसारामुळे तुरीच्या पिकाचे उत्पादन तसेच उत्पादनातील स्थैर्य वाढण्यास मोठी मदत होणार असून, शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून त्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
वाणाची वैशिष्ट्ये
◼️ या वाणाची उत्पादकता १,७५९ ते २,१५९ किलोग्रॅम प्रति हेक्टरी इतकी आहे.
◼️ हा वाण १५५ ते १६० दिवसात तयार होतो.
◼️ दाण्याचा रंग पांढरा आहे.
◼️ मर आणि वांझ या तुरीच्या प्रमुख रोगांकरिता हा वाण मध्यम प्रतिकारक आहे.
◼️ किडींना कमी बळी पडतो.
अधिक वाचा: मराठवाडा कृषी विद्यापीठाचे बाजरी पिकात मोठे यश; लोहाचे प्रमाण अधिक असणाऱ्या 'या' दोन वाणांना मान्यता
