यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने राज्यभरातील शेतकरी पेरणीपूर्व मशागत आणि बी-बियाण्यांची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला लागले आहेत.
दरवर्षी बियाणे व खतांच्या टंचाईचा आणि बोगस मालाचा अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांनी यंदा सुरुवातीपासूनच सजग राहणे आवश्यक आहे. पेरणीच्या ऐन वेळेस बियाणे मिळणे कठीण होते.
कृत्रिम टंचाई भासवून जादा दराने खते आणि बियाण्यांची विक्री केली जाते. त्यामुळे अनेक शेतकरी पेरणीपूर्वीच बियाणे, खते खरेदी करण्यावर भर देतात. त्यामुळे आताच योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शेतकऱ्यांनी कोणतेही बियाणे किंवा खते घेताना पुरावा म्हणून बिल घ्यावे. अशा प्रकारे कागदपत्र असतील, तर बोगस माल आढळल्यास शासन, कंपनीकडून नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ होते.
बोगस बियाणे घेणे टाळण्यासाठी काय कराल?
• बऱ्याच वेळा स्थानिक बाजारात स्वस्त दरात बियाणे देण्याचे आमिष दाखवले जाते. अशावेळी अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे घेणे टाळा.
• त्यापेक्षा नोंदणीकृत, सरकारी अथवा सहकारी संस्था, जिल्हा बियाणे महामंडळाच्या विक्री केंद्रांवरून खरेदी केल्यास भरवसा राहतो, तसेच ओळखीच्या दुकानात आवश्यक बियाणे, खते खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.
बियाणे खरेदी करताना लक्षात ठेवा...
• परवाना असलेल्या कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करा. दुकानदाराचा परवाना व विक्री नोंदणी तपासा. सरकारी दर्जेदार बियाण्यांना प्राधान्य द्या. महाबीज, नाफेड, सिडको, कृषी विद्यापीठांची बियाणी विश्वसनीय असतात.
• बियाण्याच्या पिशवीवरील माहिती वाचा. जसे की बियाण्याचा प्रकार, अंकुरणशक्ती, उत्पादन वर्ष, कालबाह्यता दिनांक, लॉट क्रमांक आदी. बिल आणि रोख पावती जरूर घ्या. यामुळे बियाणे बोगस निघाले तरी नुकसान भरपाईसाठी दावा करता येतो.
खते घेताना घ्या 'ही' काळजी
• खत नियंत्रण आदेश (FCO) अंतर्गत नोंदणीकृत दुकानातूनच खते खरेदी करा.
• खतांच्या बॅगवर असलेली माहिती तपासा. जसे - उत्पादन दिनांक, वजन, प्रमाणपत्र क्रमांक, उत्पादकाचे नाव.
• खते बंद बॅगमध्येच घ्या.
• खत खरेदीची पावती न विसरता घ्या. अनधिकृत विक्रेत्यांपासून सावध राहा.
हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल