मागील आठवड्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे त्याचा फायदा रब्बी पिकांना झाला. पुढील आठवड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत.
शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे कीड व रोगासंदर्भात नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
हरभरा पिकावरील घाटेआळीच्या नियंत्रणासाठी
१) घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.
२) घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.
३) हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
४) अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
५) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५% - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा
क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा
फ्लुबेंडामाईड २०% - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.
गहू
गहू पिकावर मावा कीड दिसून येताच मेटारायझियम अॅनिसोप्ली किंवा व्हर्टिसिलीयम लेकॅनी ११५ टक्के डब्ल्यू, पी. ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
ज्वारी
ज्वारी पिकावर चिकटा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास थायोमेथोक्झाम ५ ग्रॅम व मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून आवश्यकतेनुसार फवारावे.