महाराष्ट्रात जास्तीत जास्त फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी सद्यस्थितीत सुरु उसाचे व्यवस्थापन कसे कराल? पाहूया सविस्तर.
१) लागवड पद्धती
- उसाची लागण सलग सरीमध्ये दोन ओळीतील अंतर मध्यम जमिनीसाठी १००-१२० सें.मी., भारी जमिनीसाठी १२०-१५० सें.मी. ठेऊन करावी अथवा ७५-१५० सें.मी. किंवा ९०-१८० सें.मी. पट्टा पध्दतीने लागण करावी.
- मध्यम प्रतिच्या जमिनीत ओली लागण करावी. भारी व चोपण जमिनीत कोरडी लागण करावी.
२) जातींची निवड
लागणीसाठी फुले ०२६५, को ८६०३२, फुले १०००१, फुले ०९०५७ नवीन प्रसारीत वाण फुले ११०८२, फुले ऊस १५०१२ आणि फुले ऊस १३००७ या वाणांची निवड करावी.
३) बेण्याची निवड
- लागणीसाठी दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर करावा.
- बेणे मळ्यातील १० ते ११ महिन्याचे चांगले निवडून घेतलेले रसरशीत बेणेच ऊस लागवडीसाठी वापरावे.
- खोडव्याचा ऊस लागणीसाठी वापरु नये. तसेच गवताळ वाढ असलेल्या प्लॉटमधील बेणे लागवडीसाठी वापरू नये.
४) बेणे प्रक्रिया
- लागणीपूर्वी बिजप्रक्रियेसाठी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बेणे १०-१५ मिनीटे बुडवावे.
- यानंतर अॅसिटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू अनुक्रमे १ किलो आणि १२५ ग्रॅम १० प्रति लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपऱ्या ३० मिनीटे बुडवून लागणीसाठी वापराव्यात. यामुळे नत्र खताची बचत होवून स्फुरद खताची उपलब्धता वाढते.
५) तण नियंत्रण
ऊस लागणीनंतर ४-५ दिवसांनी वापश्यावर हेक्टरी ५० ग्रॅम अँट्राझिन प्रति १० लिटर पाण्यात विरघळून किंवा मेट्रीब्युझीन १५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी, फवारणी करतांना फवारलेली जमीन तुडवू नये.
६) खत व्यवस्थापन
सुरु ऊसाच्या लागणीच्या वेळी प्रति हेक्टरी २५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ६० किलो पालाश द्यावे. तसेच सुक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता असल्यास माती परीक्षनानुसार झिंक सल्फेट २० किलो, फेरस सल्फेट २५ किलो, १० किलो मँगेनीज सल्फेट व बोरॅक्स ५ किलो प्रती हेक्टरी शेणखतात मिसळून सावलीत मुरवून रांगोळी पध्दतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर ही सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते द्यावीत. को ८६०३२ ऊसासाठी २५% रासायनिक खतांची जादा मात्रा द्यावी.
७) खोड कीड नियंत्रण
- खोड किडीच्या नियंत्रणासाठी ऊसाच्या शेतात ट्रायकोग्रामा चिलोनिस ५ ते ६ ट्रायकोकार्ड १५ दिवसाच्या अंतराने प्रति हेक्टरी व ५ कामगंध सापळे (इ.एस.बी. ल्यूर) शेतात लावावे.
- आवश्यकता असल्यास क्लोरॅन्ट्रॅनिलीप्रोल दाणेदार हे किटकनाशक १८.७५ किलो अथवा फिप्रोनिल ०.३% दाणेदार हे किटकनाशक २५ किलो प्रति हेक्टरी याप्रमाणात सरीमध्ये चळीतून द्यावे.
अधिक वाचा: Unhali Mug Lagwad : उन्हाळी हंगामात कमी कालावधीचे हे कडधान्य पिक ठरतंय फायदेशीर