Join us

प्रतिकूल परिस्थितीत तग धरणारे तेलबिया पिक कारळा; बांधावर लागवड देईल अधिकचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:41 IST

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते.

कारळा हे दुर्लक्षित केलेले पण महत्त्वाचे पारंपरिक तेलबिया पीक आहे. त्यामध्ये ३५ ते ४० टक्के तेल असते. खरीप तसेच रब्बी हंगामातील कारळा पीक हे जादा पावसात तग धरते.

या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात व जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये अवर्षण प्रतिकारकशक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यात या पिकाची चांगली वाढ होते.

या पिकाला रोग आणि किडींचा विशेष प्रादुर्भाव होत नाही व उग्र वास असल्याने भटक्या जनावरांचा त्रासही कमी होतो. कारळा पिकाला पिवळी फुले येतात व ती जास्त दिवस शेतात टिकून राहतात. त्यामुळे परपरागीकरणासाठी उपयुक्त आहे.

आंतरपीक म्हणूनही चांगला प्रतिसाद आहे. कारळ्याचे तेल खाद्यतेल म्हणून उपयुक्त तसेच पेडींचा पशुखाद्य, पक्षीखाद्य तसेच सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो.

बाजारामध्ये कारळ्यासाठी सतत मागणी असून, किंमतही स्थिर असते. पक्ष्यांचा या पिकाला बिलकूल त्रास होत नाही. या पिकाला फुलधारणा झाल्यानंतर मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे शेतातील इतर परपरागासिंचित पिकांमध्ये परागीकरण जास्त प्रमाणात होते.

कोणत्याही हंगामात हे पीक येते. उपलब्ध जमिनीत खरीप तसेच रब्बी हंगामात करून कारळ्याचे उत्पादन वाढवता येईल.

कारळ्याच्या पिवळ्या धम्मक फुलांत २० ते २५ दिवस टिकून राहण्याची क्षमता असल्याने या गुणधर्माचा योग्य वापर करून आपली शेतजमीन सुशोभित करण्यासाठी या पिकाची लागवड उत्तम ठरते. तृणधान्य, भाजीपाला पिकांमध्ये लागवड करणे शक्य आहे. अशा पिकांच्या भोवती लागवड करावी.

शेताच्या सभोवताली बांधावर ३० सेंटीमीटर बाय ३० सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारमानानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. त्यामुळे बांधावरील तणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि मुख्य पिकाला जनावरांपासून व किडींपासून संरक्षण मिळते.

तसेच परपरागीकरण वाढते आणि उत्पन्नात भर पडते. पिकासाठी पाण्याचे नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटांच्या दोन्ही बाजूवर कारळ्याची ३० सेंटीमीटर बाय ३० सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी.

पेरणी ते काढणीकारळा पेरणीसाठी हेक्टरी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे. दाणे बारीक असल्याने पेरणीवेळी जास्त पडण्याची शक्यता असते. त्यामुळे बियाण्यामध्ये वाळू मिसळावी म्हणजे जास्त पेरले जाणार नाही. ९० ते १०० दिवसांत पीक तयार होते. पिकाची फुले सुकून बोंडे झाली की, पिकाची कापणी करावी. नंतर खळ्यावर १ ते २ दिवस वाळवावे, नंतर मळणी करावी व वाखणी करून दाणे वेगळे करावेत.

अधिक वाचा: Farmer Success Story : पेरूच्या आठशे झाडांतून शेतकरी बोराडे यानी घेतले २० लाखांचे उत्पन्न

टॅग्स :शेतीपीकशेतकरीलागवड, मशागतपेरणीखरीपरब्बीपीक व्यवस्थापन