हापूस, केशर, तोतापुरी, राजापुरी यांसारख्या कलमांची लागवड असल्याने येथील शेतकऱ्यांना आर्थिक आधार होत आहे.
यंदा आंबा आठ-दहा दिवसांपूर्वीच मोहरला असल्याने फळधारणा चांगली येण्याची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
मात्र, सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे करपा, भुरी सारखा रोग पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधव चिंतित आहेत.
शेतकरी बांधव चिंतित
◼️ गतवर्षी आंबा मोहर अत्यल्प प्रमाणात लागल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता.
◼️ मात्र, २०२५-२६ या हंगामात निसर्ग अनुकूल ठरल्याने आंबा मोहर साधारण दोन आठवडे लवकर आणि भरघोस प्रमाणात आला आहे. अनेक ठिकाणी झाडे मोहराने लगडली आहेत.
◼️ निसर्गाची अशीच साथ मिळाल्यास यावर्षी आंबा फळांचे विक्रमी व दर्जेदार उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
ढगाळ वातावरणात फवारणी आवश्यक
◼️ अशा परिस्थितीत करपा, भुरी, मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो.
◼️ वेळीच नियंत्रण मिळाले नाही, तर फळधारणा कमी होऊन फळगळ मोठ्या प्रमाणात होते.
◼️ गेल्या आठवड्यात पडलेल्या तीव्र थंडीमुळे अनेक ठिकाणी मोहर करपला आहे.
◼️ पुढील काळातही थंडीची लाट व ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, अशा प्रतिकूल वातावरणात एक ते दोन फवारे आवश्यक आहेत. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कोणती औषधे आणि किती प्रमाणात फवारावी?
◼️ मोहर लागल्याने परागीभवन करणाऱ्या मधमाश्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सौम्य व नाजूक औषधांचीच फवारणी करावी.
◼️ करंज तेल व नीम तेल यांचे आलटून पालटून फवारे घ्यावेत.
◼️ २० लीटर पाणी पंपासाठी लिक्विड गंधक २५ ते ३० मिलिलिटर, नीम तेल ३५ ते ४० मिलिलिटर, स्टीकर म्हणून लिक्विड साबण ३ मिलिलिटर हे मिश्रण नीट एकत्र करून फवारणी करावी.
◼️ वेळीच सर्व व्यवस्थापन पूर्ण केल्यास विपुल उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल.
महत्वाचे: आपल्या जवळील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या तज्ञांशी संपर्क साधूनच पिक संरक्षणासाठी फवारण्या कराव्यात.
अधिक वाचा: अमेरिकेच्या कॉर्पोरेट शेतीपुढे भारतीय शेतकरी तग धरणार का? आपल्या शेती क्षेत्रावर कसा होईल परिणाम?
