Dast Nondni : दस्त नोंदणी करण्यावर कोणत्याही कायदेशीर तरतुदींचे बंधन नसेल तर तो दस्त नोंदणीस स्विकारला जातो. अशा दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेतील सर्वसाधारपण टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
भाग 1- दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोदंणीस सादर करण्यापूर्वी पक्षकारांनी पूर्ण करावयाची सर्वसाधारण प्रक्रिया
- 1. व्यवहाराच्या अनुषंगाने दस्त तयार करणे (लिहीणे)
- 2. दस्त नोंदणीसाठी, दस्त प्रकारानुसार आवश्यक असणारी कागदपत्रे, परवानग्या इ. संकलित करणे.
- 3. जर दस्तऐवजाचे मुद्रांक शुल्क मिळकतीच्या बाजारमूल्यावर अवलंबून असेल (उदा. खरेदीखत) तर त्या मिळकतीचे मूल्यांकन तपासून घेणे.
- 4. दस्तास मुद्रांक अधिनियमानुसार देय असणारे मुद्रांक शुल्क भरणे.
- 5. देय नोंदणी फी भरणे.
- 6. दस्तावर साक्षीदारांसमोर सहया/निष्पादन (Execution) करणे.
- 7. उपरोक्त प्रमाणे पूर्तता केल्यांनतर, दस्त नोदंणीसाठीचा वेळ वाचविणेसाठी विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या, पुढील पर्यायाचा वापर पक्षकार करु शकतात.
- अ) दस्त नोंदणीसाठी आवश्यक असणारी दस्ताची माहिती पब्लिक डाटा एंट्रीद्वारे संगणकावर ऑनलाईन भरणे.
- ब) ई-स्टेप-ईन या सुविधेद्वारे दस्त नोंदणीसाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ आरक्षित करणे.
- 8. दस्तऐवजावर सही केल्यानंतर चार महिन्याच्या आत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीस सादर करणे आवश्यक आहे.
भाग 2- दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर केल्यानंतरची सर्वसाधारण प्रक्रिया-
- 1. टोकन रजिस्टरमध्ये नोंद घेतली जाते व टोकन दिले जाते.
- 2. दुय्यम निबंधकाद्वारे दस्ताची पडताळणी केली जाते.
- 3. अगोदर पब्लिक डाटा एन्ट्री केली असल्यास, त्याद्वारे प्राप्त 11 अंकी संकेतांकाचे आधारे दुय्यम निबंधक कार्यालयातील संगणकावर डाटा उपलब्ध करुन घेतला जातो. अन्यथा दुय्यम निबंधक कार्यालयात इनपुट फॉर्मच्या आधारे डाटा एन्ट्री केली जाते.
- 4. यथोचित मुद्रांकीत केलेला (देय मुद्रांक शुल्क भरलेला) व नोंदणीस पात्र दस्त नोंदणीस सादर करुन घेतला जातो.
- 5. आवश्यक ती नोंदणी फी व दस्त हाताळणी शुल्क प्रदान केल्यांनतर त्याची पावती दिली जाते.
- 6. दस्त निष्पादक पक्षकारांकडून अथवा त्यांचे मुखत्यारधारकाकडून त्यांचे निष्पादनाचा कबुलीजबाब दिला जातो.
- 7. दस्तात नमूद मोबदला दुय्यम निबंधक यांचेसमोर देण्यात येत असल्यास, त्याबाबतची नोंद दस्तावर घेतली जाते.
- 8. कबुलीजबाब देणा-या पक्षकारास ओळखत असलेल्या ओळखदारांकडून ओळख पडताळणी केली जाते.
- 9. दुय्यम निबंधक दस्तावर नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र देतात.
- 10. दुय्यम निबंधक मूळ दस्त स्कॅन करुन, मूळ दस्त व त्यासोबत थंबनेल प्रींट, सूची क्र.2 व दस्ताची प्रत (स्कॅन्ड इमेज) असलेली सीडी पक्षकारास देतात.
- नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासन
