Vegetable Crops : वेलवर्गीय भाजीपाला पिकांमधील कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. कीड नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना कराव्यात हे समजून घेऊयात...
वेलवर्गीय भाजीपाला पिके - कीड नियंत्रण
- वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.
- नियंत्रणासाठी फुले येण्याच्या काळात 'क्यू ल्यूर' कामगंध सापळे एकरी ५ या प्रमाणात मंडपात लावावेत.
- फळांची काढणी योग्य पक्वतेस करावी. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळमाशीची उत्पत्ती वाढत असल्याने अशी फळे गोळा करून नष्ट करावीत.
- वेलांखालील माती वेळोवेळी हलवून घ्यावी.
- कारली, पडवळ, दुधी भोपळा, दोडका या पिकांवर तांबडे भुंगेरे, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अँझाडीरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
कोबीवर्गीय पिके
आंतरमशागत
कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमित द्याव्यात.
या पिकास गड्डा तयार होण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास गड्डे लहान राहतात.
लागवडीनंतर गरजेनुसार एक किंवा दोन खरपण्या करून माती भसभशीत आणि पीक तणविरहित ठेवावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
