Vegetable Farming : वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी मंडप पद्धत (Vegetable Crop Management) किंवा ताटी पद्धत वापरली जाते. या पद्धतीमुळे पिकांची वाढ चांगली होते आणि दर्जेदार उत्पादन मिळते. ही पद्धत कशी वापरली जाते, या पद्धतीचे फायदे काय आहेत? जाणून घेऊया या लेखातून....
भाजीपाला पिकास आधार देण्याची मंडप पद्धत
- मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्वबाजूंनी प्रत्येक ५-६ फूट अंतरावर १० फूट ऊंच, ४" जाड लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूने झुकतील अशा रीतीने २ फूट जमिनीत गाडावेत.
- प्रत्येक सरीच्या दर १० फुटांवर १० फूट ऊंच, ३० जाड डांब जमिनीत २ फूट गाडावेत.
- म्हणजे शेतात १०x१० चौ. फुटांवर लाकडी बल्या उभ्या राहतील.
- प्रत्येक डांबाच्या बाहेरील बाजूने ८ गेज तारेने ताण द्यावा. त्यासाठी १-१.५ फूट लांबीच्या दगडास दुहेरी तार बांधून तो दगड २ फूट जमिनीत पक्का गाडावा.
- नंतर डांब बाहेरील बाजूस ओढून ६.५ फूट उंचीवर ताणाच्या तारेने पक्का करावा.
- तार खाली घसरू नये यासाठी डांबावर यू आकाराचा खिळा ठोकून तार पक्की करावी.
- डांबांना ताण दिल्यानंतर ८ गेजची दुहेरी तार पीळ देऊन ६.५ फूट उंचीवर यू आकाराचा खिळा ठोकून त्यातून ओढून घ्यावी.
- मंडपाची तार ओढण्यापूर्वी मंडपाच्या सर्व कोपऱ्यांतील डांब भक्कम असावेत, त्यांना ८ गेजच्या तारेने बाहेरच्या दोन्ही दिशेने दुहेरी ताण द्यावा.
- तारा पुलरच्या साह्याने ताणून घ्याव्यात.
- नंतर १० गेजची तार लाकडी बल्या उभ्या केलेल्या ओळीवर जमिनीपासून ६.५ फूट उंचीवर यू आकाराच्या खिळ्याने पुलरच्या साह्याने ओढून पक्की करावी. त्यानंतर २ फूट अंतरावर १६ गेज तार ताणलेल्या तारेवर आडवी-उभी पसरावी.
- जमिनीपासून ६.५ फूट उंचीवर २४२ फूट आकाराचा तारेचा चौरस तयार होईल.
- मंडप उभारणी वेल साधारण १-१.५ फूट उंचीचे होण्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी