3G Cutting Method : वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये हि कटिंग पद्धत" वापरली जाते. ज्यामध्ये वेलीची वाढ विशिष्ट उंचीपर्यंत झाल्यावर सुरुवातीच्या ५-७ पानांच्या वरील सर्व उपशाखांची छाटणी केली जाते. काय आहे ही पद्धत, कशी वापरली जाते, ते पाहुयात....
वेलवर्गीय भाजीपाला पिके :
त्रीस्तरीय कटिंग पद्धत
- वेलवर्गीय भाजीपाला पिके उदा. दुधी भोपळा, दोडका, काकडी, डांगर, कोहळा यांमध्ये त्रीस्तरीय कटिंग पद्धत उपयुक्त ठरते.
- पिकाची लागवड झाल्यानंतर त्या पिकाची उंची तीन ते पाच फुटापर्यंत वाढू द्यावी.
- सुरुवातीच्या पाच ते सात पानांपर्यंत कोणतीही उपशाखा त्या वेलीवर येऊ देऊ नये.
- उपशाखा आल्यास त्या ताबडतोब खुडून टाकाव्यात. या आलेल्या उपशाखांवर नर फुलांचे प्रमाण अधिक असते.
- पाच ते सात पानानंतर येणाऱ्या उपशाखा खुडू नयेत. त्या नैसर्गिकरित्या वाढू द्याव्यात.
- वेली पाच ते सात फूट उंचीच्या झाल्यावर त्याच्या मुख्य शाखेचा शेंडा खुडावा.
- त्यामुळे त्याची सरळ वाढ थांबून त्यावर उपशाखा येण्यास सुरुवात होते.
- आलेल्या उपशाखांवर १२ ते १५ पाने झाली की त्यांचा पुन्हा शेंडा खुडावा.
- त्यावर पुन्हा उपशाखा येतील. या आलेल्या उपशाखांची पुन्हा वाढ करून घ्यावी.
- या पद्धतीने मुख्य शाखा म्हणजे पहिला स्तर, उपशाखा म्हणजे दूसरा स्तर आणि शेवटी उपशाखांवर आलेल्या शाखा म्हणजे तिसऱ्या स्तराच्या शाखा होय.
- या क्रमाने वेलींची वाढ करून घ्यावी.
- आलेल्या तिसऱ्या स्तराच्या शाखांची वाढ चांगल्यारीतीने होऊ द्यावी. त्यावर मादी फुलांची उत्पत्ती होते.
- त्यामुळे फळधारणा अधिक होऊन उत्पादनात वाढ होते.
- या वेलींवर अधिक फळधारणा होत असल्याने अन्नद्रव्याचे व पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
- या पिकांत विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाची विशेष दक्षता घ्यावी लागते.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
