Tur Pest Management : तूर हे हंगामातील महत्त्वाचे आणि नफ्याचे पीक आहे, पण या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा (Maruca vitrata) प्रादुर्भाव झाल्यास मोठे नुकसान होते. (Tur Pest Management)
अळी फुलोऱ्यापासून शेंगांपर्यंत पिकाचे नुकसान करते आणि उत्पादन २५ ते ७० टक्क्यांनी घटवते. अशा परिस्थितीत वेळेवर निरीक्षण, जैविक उपाययोजना आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब केल्यास तूर पिकाचे संरक्षण शक्य आहे. (Tur Pest Management)
ही किड तूर, कापूस, सोयाबीन, भेंडी, टोमॅटो, हरभरा यांसह जवळपास २०० पिकांवर प्रादुर्भाव करते. (Tur Pest Management)
किडीचा जीवनक्रम व नुकसान
अंडी अवस्थेतून बाहेर आलेल्या लहान अळ्या तुरीची कोवळी पाने खातात.
फुलोऱ्याच्या अवस्थेत त्या कळ्यांवर उपजीविका करतात.
शेंगा लागल्यानंतर या अळ्या शेंगांना छिद्र पाडतात आणि आतील दाणे पोखरून खातात.
एका अळीने ३० ते ४० शेंगा नुकसानग्रस्त करू शकतात.
ढगाळ हवामानात या किडीचा प्रादुर्भाव वेगाने वाढतो आणि नुकसानाची पातळी २५ ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.
आर्थिक नुकसानीची पातळी
कीड नियंत्रणासाठी तातडीची कृती आवश्यक आहे,
जर कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवसांत ८ ते १० पतंग दिसले
प्रत्येक मोटर ओळीवर २ अळ्या आढळल्या
किंवा ५ टक्के शेंगा किडग्रस्त आढळल्या
एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Pest Management)
शेतीपूर्व तयारी
उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून कीडीचे कोष नष्ट करा.
बियाण्यात १ टक्के ज्वारी किंवा बाजरीचे बी मिसळून पेरणी करा.
तुरीसोबत ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन यांसारखी आंतरपिके घ्या.
संपूर्ण गावात एकाचवेळी पेरणी करून क्षेत्रीय पद्धती अवलंबा.
पिक व्यवस्थापन
वेळेवर आंतरमशागत करून तणविरहित शेत ठेवा.
मित्र कीडांचे संवर्धन करा (उदा. ट्रायकोग्रामा परजीवी).
शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टर लावा.
अळी नियंत्रण
मोठ्या अळ्या वेचून नष्ट करा.
शेंगा लागल्यावर झाड हलवून अळ्या गोळा करा आणि जमिनीत गाडा.
जैविक उपाययोजना
५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
एचएएनपीव्ही विषाणू (Helicoverpa armigera NPV) ५ मि.ली. १० लिटर पाण्यात फवारणी करा.
रासायनिक कीटकनाशके (१० लिटर पाण्यासाठी प्रमाण)
कीटकनाशकाचे नाव | प्रमाण |
---|---|
फ्ल्यूबेन्डामाईड ३९.३५% SC | २ मि.ली. |
क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५% SC | ३ मि.ली. |
इमामेक्टिन बेन्झोएट ५% SG | ४.४ ग्रॅम |
स्पिनोसॅड ४५% SC | २ मि.ली. |
क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३% + लॅमडा-सायहॅलोथ्रिन ४.६% ZC | ४ मि.ली. |
टीप: वरील प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे.
नियमित निरीक्षण करा
पिकावरील कीड व रोगांचे निरीक्षण दर ५ दिवसांनी करा.
प्रादुर्भाव वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
शेंगा पोखरणारी अळी ही तुरीच्या उत्पादनावर मोठा परिणाम करणारी कीड आहे. वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय, जैविक फवारण्या आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.
(सौजन्य: पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), कृषि कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)