Seasame Farming : तीळ तेलात सिसामीन आणि सिसामोल हे दोन महत्वाचे घटक असलेने आयुर्वेदात तीळ पिकास अनन्यसाधारण महत्व आहे. पुढील महिन्यात तिळाच्या लागवडीला प्रारंभ होईल. तिळाच्या दर्जेदार आणि अधिक उत्पादनासाठी लागवड तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे.
नव्याने तीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या काही गोष्टी :
- जमीन : जमीन खोल नांगरून तयार करावी.
- शेणखत : ५ टन/हेक्टरी जमिनीत टाकावे.
- जमीन भुसभुशीत करून फळी मारून सपाट करावी.
- पेरणी : पेरणी बैल पाभरीने किंव्हा टोकन पद्धतीने करावी.
- बियाणे पेरणीची खोली : जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली इतक्या खोलीवर बियाणे पेरावे.
- जमिनीत २.५ सेंटीमीटर खोली पेक्षा जास्त खोलीवर टाकल्यास बियाणे उगवत नाही. म्हणून पेरणी करतांना योग्य ती काळजी घावी.
- ट्रॅक्टरने पेरणी करू नये. कारण ट्रॅक्टरला लावलेल्या पाभरीने बियाणे २.५ सेंटीमीटर खोलीवर न पडता त्याहून अधिक खोलीवर पडून पुढे उगवनक्षमता अतिशय कमी होते. म्हणून ट्रॅक्टरने पेरणी करणे टाळावे.
- वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या कुटून बारीक पावडर तयार करून चाळणीने गाळून घ्यावी.
- या पावडरमध्ये तीळ बियाणे एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
- साधारणपणे १ किलो बियाणात ५ किलो गोवऱ्या कुटलेली पावडर एकत्रित करून पाभरीने पेरणी करावी.
- पेरणी अंतर : ४५ x १० सेंटीमीटर अंतरावर करावी.
- बियाणे : २.५ किलो/हेक्टर तीळ बियाणे वापरावे
- सुधारित जाती : फुले पूर्णा, टी एल टी - १०, एकेटी-१०१, एन टी ११
- पेरणीची वेळ : १५ जानेवारी नंतर कमीत कमी तापमान २० डिग्री सेल्सिअस च्या वर गेल्यावर. कमी तापमानात उगवण क्षमतेवर परिणाम होतो.
- खत व्यस्थापन : ५० किलो नत्र/हेक्टरी विभागून द्यावा.
- पहिला नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पेरणीचे वेळी द्यावा.
- दुसरा नत्राचा हप्ता : २५ किलो नत्र/हेक्टरी पिक ३० दिवसाचे पिक झाल्यानंतर द्यावा.
- जमिनीत पुरेसा ओलावा असतांना पेरणी करावी.
- तीळ हे पिक जास्त पाण्याला अतिशय संवेदनशील असलेने दलदल असलेल्या भागात पेरणी करू नये.
- विरळणी : पिक उगवण झाल्यानंतर पहिली विरळणी १५ दिवसांनी करावी. दुसरी विरळणी ३० दिवसांनी करावी.
- पिक संरक्षण : तीळ पिकावर पाने कुरतडणारी अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास क्विनोल्फोस १मिली.प्रती लिटर पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.
- कोळपणी : पेरणीचे अंतर ४५ x १० सेंटीमीटर असलेने बैल कोळप्याने पहिली कोळपणी पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
- प्रथम निंदनी : पिक ३० दिवसाचे असतांना करावी.
- दुसरी कोळपणी : ४५ दिवसांनी करावी.
- दुसरी निंदनी : तण तीव्रता बघून पिक ६० दिवसाचे असतांना दुसरी निंदनी करावी.
- पिक काढणी : साधारणपणे तिळाच्या बोन्ड्या पिवळसर झाल्याने कापणी करावी.
- कापणी केल्यावर पेंढ्या बांधून त्यांच्या खोपड्या करून वाळवाव्यात.
- साधारणपणे काढणीनंतर १० ते १५ दिवस पेंढ्या वाळवाव्यात. त्यानंतर जागेवरच तीळ बियाणे पेंढ्या उलट्या करून झटकून घ्यावे.
- उत्पन्न : ७ ते ८ क्विंटल/हेक्टरी.
- डॉ.सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार अखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प, तेलबिया संशोधन केंद्र,जळगाव
