Kanda Chal : कांदा पिकाची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काढणी (onion Harvesting) सुरू होते. कांदा काढणी झाल्यांनतर लगेचच शेतकरी उन्हाळ कांद्याची साठवणूक सुरू करतात. अस्मानी संकटाचा सामना करावा लागल्याने यावर्षी जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड सुरू असल्याने सध्या कांदा उत्पादक शेतकरी कांदा चाळ दुरुस्ती व डागडुजीच्या कामात गुंतला आहे.
उन्हाळ कांदा साठवणुकीसाठी (onion Storage) शेतकरी विविध प्रयोग करीत असतात. त्यामुळे सध्या उन्हाळ कांदा काढणीपूर्वी कांदा साठवणूक करण्याची जागा, कांदा चाळ दुरुस्ती तसेच डागडुजी करण्याच्या कामात शेतकरी गुंतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळ तयार करताना तारेच्या जाळीचा वापर केला असून अनेक शेतकरी वेळू काठी तसेच टोकर, कायरी या वनस्पतीचा वापर करतात. अनेक ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी तुर काठी, टोकर काठी, जाळी व इतर साधनाची तजवीज करण्यात कांदा उत्पादक शेतकरी गुंतले आहेत.
लोहोणेर येथील कांदा उत्पादक बाळासाहेब बच्छाव यांनी यावर्षी तोर काठी व जाळी तसेच सागवान पट्ट्याचा वापर केला आहे. यामुळे कांद्यामध्ये हवा खेळती राहिल्याने कांदा जास्त काळ व चांगला टिकतो. कांदा साठवण्याच्या जागी अनेक शेतकरी सिमेंट काँक्रीट करून घेतात. तसेच कांद्याला हवा योग्य पद्धतीने लागावी म्हणून कांदा चाळीची उंची वाढवत असतात तर काही शेतकरी या जागेवर वाळू टाकतात. कांदा सडल्यास त्यातून निघणारे खराब पाणी हे त्या जागेत मुरते व दुर्गंधी पसरत नाही. शिवाय उसाच्या पाचटापासून तयार केलेल्या चाळीत तापमान नियंत्रणात राहून कांदा अधिक काळ टिकतो.
कांदा हे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक आहे. लागवडीपासून कांद्याची विक्री होईपर्यंत शेतकरी काळजी घेत असतो. कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या चाळीत योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास तो जास्त काळ टिकतो व बाजार पेठेत त्याला चांगला भाव मिळत असतो.
- बाळासाहेब बच्छाव, कांदा उत्पादक, लोहोणेर
Jamin Kharedi : जमीन खरेदी करताना एन ए आहे का? झोन कुठला? सोबत 'या' गोष्टीही तपासा