Agriculture News : उन्हाळी भुईमूग आणि बाजरी पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण केली जाते. यानंतर पिके वाढीच्या अवस्थेत असताना आंतरमशागत आणि ताण नियंत्रण करणे गरजेचे ठरते. या दोन्ही पिकांचे व्यवस्थापन कसे करावे, हे समजून घेऊयात...
भूईमुगातील तण व्यवस्थापन
- भूईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरीता पेरणीनंतर लगेच पेंडीमेथालिन १.०० किलो क्रि. घ. प्रति हेक्टरी १० लि. पाण्यातून ओलीवर फवारणी करावी.
- तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी परसूट किंवा टरगासुपर १५ मिली व्यापारी उत्पादन / हे. १० लिटर पाण्यातून द्यावे.
- पेरणी नंतर चाळीस दिवसापर्यंत पीक तणविरहित ठेवावे. त्यासाठी वेळोवेळी कोळपणी व खुरपणी करावी.
- पेरणी नंतर ओळीत अंतर आढळून आल्यास बी टाकून ताबडतोब नांगे भरावेत.
बाजरीतील आंतरमशागत व तण नियंत्रण
- पेरणीपासून सुरवातीचे ३० दिवस शेत तण विरहित ठेवणे गरजेचे असते.
- याच कालावधीत तण व पिकामध्ये हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते.
- दोनवेळा कोळपणी व गरजेनुसार दोनवेळा खुरपणी करावी.
- मजूरटंचाई असल्यास, पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अॅट्राझिन (५० डब्ल्यूपी) ४०० ग्रॅम प्रति एकरी प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सम प्रमाणात फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
