Agriculture News : पक्षी थांबे म्हणजे शेतात उभे केले जाणारे 'T' आकाराचे खांब किंवा संरचना, जे पक्ष्यांना विश्रांतीसाठी आणि कीड वेचण्यासाठी आकर्षित करतात. यामुळे शेतीमधील परिसंस्थेचे संतुलन राखले जाते आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक कार्याचा उपयोग होतो. हेच पक्षी थांबे कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीमार्फत विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.
पिकामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी "पक्षी थांबा" हा महत्त्वाचा घटक आहे. हे थांबे शेतात पिकांच्या सभोवती लावले जातात, ज्यामुळे विविध कीटकभक्षी पक्षी, जसे की गायबगळे, कोतवाल, खाटीक आणि वेडा राघू, शेतात येऊन अळ्या व इतर कीड खातात. या उपायामुळे शेतकरी कमी खर्चात रासायनिक कीटकनाशकांशिवाय पिकांचे संरक्षण करू शकतात.
दरम्यान कृषी विज्ञान केंद्र हिंगोली परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड असल्यामुळे बांबूच्या बारीक फांदीपासून पक्षी थांबे तयार करण्यात आलेले असून ते कृषी विज्ञान केंद्राच्या विक्री केंद्रामध्ये एका एकरासाठी संच विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.
प्रति पक्षी थांबा वीस रुपये या दराने खरेदी करता येणार आहे. शक्यतो स्वतःच बनवावे, परंतु बनवण्यासाठी अडचणी येत असतील तर येथील विक्री केंद्रातून ते घेऊन जावे. सोबतच 100 ग्रॅम ज्वारीच्या बियाण्याचा सुद्धा हरभरा पिक पेरताना वापर केल्यास नैसर्गिक पक्षी थांबे सुद्धा निर्माण होऊ शकतात. ज्वारीच्या बियाण्याचा 100 ग्रॅम चा संच सुद्धा उपलब्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षी थांबे कसे लावले जातात?
'T' आकाराचे खांब शेतात ठिकठिकाणी उभे केले जातात.
प्रत्येक एकरला अंदाजे १० ते २५ पक्षी थांबे लावणे अपेक्षित असते.
या थांब्यांवर पक्षी बसतात आणि पिकांचे निरीक्षण करून किडी खातात.
Soyabean Kadhani : लवकर पक्व होणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची काढणी कधी करावी, वाचा सविस्तर