Organic Disease Control : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाने विकसित केलेले 'बायोमिक्स' (Biomix) हे १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे संशोधनात्मक मिश्रण शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.(Organic Disease Control)
पिकांवरील विविध रोगांचे नियंत्रण, मृदाजन्य किडींपासून संरक्षण तसेच जमिनीतून अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याचे काम हे जैव मिश्रण प्रभावीपणे करते, असे विद्यापीठाच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.(Organic Disease Control)
१४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण
बायोमिक्समध्ये रोगनियंत्रण करणाऱ्या बुरशी व जीवाणूंसह पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे सूक्ष्मजीव समाविष्ट आहेत. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार हे मिश्रण सर्वच पिकांसाठी उपयुक्त असून विशेषतः हळद व अद्रक पिकामध्ये लागवडीपासूनच त्याचा वापर करता येतो.
उगवण लवकर, पिक जोमदार
हळद व अद्रक लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया किंवा बिजोत्तेजन (Seed Biopriming) केल्यास सर्वसाधारण वेळेपेक्षा उगवण लवकर होते. यामुळे पिकाची सुरुवातच जोमदार होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
बायोमिक्स वापराचे प्रमुख फायदे
* कंदकुज व इतर मृदाजन्य रोगांपासून संरक्षण
* हुमणी, कंदमाशी, खोडकीड यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी
* कंदवर्गीय पिकांमध्ये कंदाचा आकार, संख्या, लांबी व व्यास वाढतो
* पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होऊन अन्नद्रव्यांचा चांगला पुरवठा
* जमिनीत अनुपलब्ध अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत
* पानांवरील ठिपके व करपा रोगांचा प्रादुर्भाव कमी
* सूत्रकृमींपासून संरक्षण
उत्पादन, उत्पादकता व दर्जात लक्षणीय वाढ
हळदीमध्ये वाळलेल्या हळदीचा उतारा वाढतो तसेच करक्युमीनचे प्रमाण अधिक मिळते
वापरण्याची पद्धत व प्रमाण
कंद प्रक्रिया
१० लिटर पाण्यात २०० ग्रॅम किंवा २०० मिली बायोमिक्स मिसळून द्रावण तयार करावे. लागवडीसाठी निवडलेले कंद ३० ते ६० मिनिटे या द्रावणात बुडवून सावलीत सुकवून लागवड करावी.
बिजोत्तेजन
१०० लिटर पाण्यात २ किलो किंवा २ लिटर बायोमिक्स मिसळून द्रावण तयार करावे. बेणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सुकवून लागवड करावी.
एकरी प्रमाण
५ किलो किंवा ५ लिटर (४ किलो/लिटर आळवणीसाठी व १ किलो/लिटर फवारणीसाठी)
आळवणी
२०० लिटर पाण्यात ४ किलो किंवा ४ लिटर बायोमिक्स मिसळून ठिबक सिंचनाद्वारे किंवा पंपाने आळवणी करावी.
फवारणी
१० लिटर पाण्यात १०० ग्रॅम किंवा १०० मिली या प्रमाणात फवारणी करावी.
कोणत्या पिकांसाठी उपयुक्त?
हळद, अद्रक, सोयाबीन, कापूस, मोसंबी, संत्रा, लिंबू, डाळिंब, टरबूज, मिरची, वांगे, पपई, तूर, हरभरा, केळी, द्राक्षे आदी पिकांसाठी बायोमिक्स उपयुक्त आहे.
वापरताना घ्यावयाची काळजी
* बायोमिक्सचा वापर रासायनिक घटकांसोबत करू नये
* थंड व कोरड्या जागेत साठवण करावी
* वापराच्या वेळी जमिनीत ओलावा असावा
* वापरण्यापूर्वी व नंतर ४–५ दिवस रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर टाळावा
शाश्वत शेती, कमी खर्चात अधिक उत्पादन आणि मातीचे आरोग्य जपण्यासाठी बायोमिक्सचा वापर शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
