New Safflower Varieties : भारतात तेलबिया उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. (New Safflower Varieties)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी (वनामकृवि) अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (AICRP on Safflower) मार्फत विकसित करण्यात आलेल्या करडईच्या दोन सुधारित वाणांना केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. (New Safflower Varieties)
भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिसूचना क्र. S.O. 6123(E), दिनांक ३१ डिसेंबर २०२५ अन्वये पीबीएनएस–२२१ (परभणी सुजलाम) आणि पीबीएनएस–२२२ (परभणी सुफलाम) या वाणांना अधिसूचित वाण म्हणून घोषित करण्यात आले आहे. (New Safflower Varieties)
झोन-१ साठी शिफारस; कोरडवाहू व बागायतीसाठी उपयुक्त
हे दोन्ही करडई वाण झोन-१ (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा) या राज्यांसाठी शिफारसीत करण्यात आले असून कोरडवाहू तसेच सिंचित (बागायती) परिस्थितीत लागवडीस योग्य आहेत.
बदलत्या हवामान परिस्थितीतही स्थिर उत्पादन देण्याची क्षमता या वाणांमध्ये असून, रब्बी हंगामासाठी हे वाण विशेष उपयुक्त ठरणार आहेत.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा टप्पा
या यशाबद्दल बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, या सुधारित वाणांच्या प्रसारामुळे करडई पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.
उच्च तेलांश, रोगसहिष्णुता आणि कमी उत्पादन खर्च यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार व फायदेशीर उत्पादन मिळेल. परिणामी शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक स्थिती बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हे वाण वरदान ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.
बदलत्या हवामानातही उत्पादनात स्थैर्य
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, या दोन नवीन करडई वाणांमुळे उत्पादनाबरोबरच उत्पादनातील स्थैर्य वाढेल. हवामानातील चढ-उतार, मर्यादित पाणी उपलब्धता आणि रोगांचा प्रादुर्भाव या अडचणींवर मात करण्याची क्षमता या वाणांमध्ये आहे.
यामुळे शेतकऱ्यांना हमखास आणि शाश्वत उत्पादन मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच राज्यातील तेलबियाणे उत्पादन वाढीस आणि आयात अवलंबित्व कमी करण्यासही या वाणांचा मोलाचा वाटा राहणार आहे.
शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे
या महत्त्वपूर्ण यशामागे अखिल भारतीय करडई संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. आर. आर. धुतमल यांच्यासह सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी या वाणांच्या निर्मितीत सहभागी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी करडई शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. घुगे, करडई शास्त्रज्ञ डॉ. आर. आर. धुतमल, कृषी विद्यावेत्ता डॉ. संतोष शिंदे तसेच प्रकल्पातील वैज्ञानिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
करडईच्या सुधारित वाणांची वैशिष्ट्ये
पीबीएनएस–२२१ (परभणी सुजलाम)
परिपक्वता कालावधी : १२५ ते १३० दिवस
बागायती : १८ ते २० क्विंटल/हेक्टर
कोरडवाहू : १२ ते १५ क्विंटल/हेक्टर
मर रोग, अल्टरनेरिया रोग व मावा किडीस सहनशील
तेलाचे प्रमाण : सुमारे ३४ टक्के
कोरडवाहू व बागायती दोन्ही परिस्थितीस अनुकूल
पीबीएनएस–२२२ (परभणी सुफलाम)
परिपक्वता कालावधी : १२५ ते १३० दिवस
बागायती : १८ ते २० क्विंटल/हेक्टर
कोरडवाहू : १२ ते १५ क्विंटल/हेक्टर
मर (फ्युजेरियम विल्ट) रोगास मध्यम प्रतिकारक
तेलाचे प्रमाण : सुमारे ३४.३८ टक्के
बदलत्या हवामानातही स्थिर उत्पादन क्षमता
तेलबिया उत्पादनाला नवी दिशा
'वनामकृवि'च्या या दोन सुधारित करडई वाणांमुळे तेलबिया पिकांना नवसंजीवनी मिळणार असून, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे वाढलेला कल पुन्हा तेलबियांकडे वळण्यास मदत होणार आहे. राज्यासह देशातील तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी हे वाण भविष्यात निर्णायक ठरतील, यात शंका नाही.
हे ही वाचा सविस्तर : Oil Seeds Crops : तेलबिया पिकांना 'ब्रेक'; भाजीपाला पुढे सरसावतोय वाचा सविस्तर
