Krushi Tractor Yojana : राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना यंदा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शासनाची मदत मिळाली. जर तुम्हालाही ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यास शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेतून खरेदी करता येईल. कारण या योजनेतून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते आहे. त्यामुळे तुमचं ट्रॅक्टर खरेदीचं स्वप्न साकार होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी विभागातून विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजना होय. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर यांसारख्या कृषी अवजारांसाठी सबसिडी दिली जाते. ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात, हे पाहुयात...
प्रथम अर्ज, प्रथम निवड पद्धत
महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो. या पोर्टलवर अनेक कृषी योजनांचे अर्ज भरले जातात. यामध्ये 'प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार शेतकऱ्यांची निवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज केला आहे, त्यांना प्राधान्य असते.
कागदपत्रे सादर न केल्यास लाभ रद्द होणार
महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांना विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये ७/१२, ८-अ, कोटेशन, इत्यादी कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा अर्जात त्रुटी आढळल्यास, त्यांचा लाभ रद्द होतो.
शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक वस्तू, यंत्रे सबसिडीतून मिळतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते. या आर्थिक वर्षात ३१६ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर अवजारांचा तर ५ शेतकऱ्यांना सिंचन योजनेचा लाभ दिला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान आल्यानंतर त्यांच्या खात्यात अनुदान वर्ग केले जाणार आहे.
- शंकरराव तोटावार, जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर
