Krushi salla : मराठवाडा विभागात वादळी वारा, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम तसेच काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेती व पीक व्यवस्थापन योजनेस पुन्हा एकदा आढावा घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.(Krushi salla)
या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा योजनेंतर्गत तयार करण्यात आलेला कृषी सल्ला जाणून घ्या सविस्तर (Krushi salla)
विद्यापीठाने हवामानाचा आढावा, आगामी हवामानाच्या सूचना आणि विविध पिकांनुसार आवश्यक उपाय योजनांचा समावेश आहे. या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी योग्य नियोजन करावे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, २७ मे २०२५ दरम्यान मराठवाडा विभागातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वारा (४०–५० किमी/ता.), मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सामान्य कृषी सल्ला :
* हवामान अनुकूल असल्याने खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतात खोल नांगरणी करून रान मोकळे ठेवावे.
* शेतात पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी.
* २९ मेपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस व कमी तापमानाची शक्यता असल्यामुळे हवामान बदलाचा पीक व्यवस्थापनावर परिणाम होईल.
हवामान चेतावणी व सारांश
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार, २७ मेपर्यंत मराठवाड्यात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमीपर्यंत राहण्याची शक्यता असून वादळ, मेघगर्जना व विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचा संदेश
* काढणीस तयार असलेल्या उन्हाळी पिकांची, फळांची व भाजीपाला पिकांची त्वरित काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी.
* पावसामुळे भिजणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता खराब होऊ शकते, त्यामुळे साठवणूक योग्य जागी करणे अत्यावश्यक आहे.
पीक व्यवस्थापन सल्ला
ऊस पीक
* पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसल्यास पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
* कीटकनाशकांमध्ये क्लोरोपायरीफॉस २०% (३० मिली/१० लि.), इमिडाक्लोप्रिड १७.८% (३ मिली/१० लि.), किंवा ॲसीफेट ७५% (२० ग्रॅम/१० लि.) वापरावा.
* खोड किडीसाठी क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% (४ मिली/१० लि.) फवारणी करावी.
खरीप हंगाम पेरणी
* सोयाबीन, ज्वारी, बाजरी, हळद यांसाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
* सोयाबीनसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा.
उन्हाळी तीळ
* काढणी त्वरित करून सुरक्षित ठिकाणी साठवावा.
भाजीपाला व्यवस्थापन
* रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% (१० मिली/१० लि.) किंवा डायमेथोएट ३०% (१३ मिली/१० लि.) फवारणी करावी.
* काढणीस तयार असलेली भाजीपाला पीके लवकरात लवकर काढून सुरक्षित जागी ठेवावी.
फळबाग व्यवस्थापन
* संत्रा/मोसंबी बागेत ००:५२:३४ खताची (१.५ किलो/१०० लि.) फवारणी करावी.
* लहान झाडांना आधार द्यावा.
* फळधारणा अवस्थेतील बागांमध्ये पावसामुळे अन्नद्रव्यांची कमतरता भासू नये म्हणून आवश्यक ते उपाय करावेत.
तुती रेशीम उद्योग
* तापमान २२–२८ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८५% पेक्षा जास्त होऊ नये.
* संगोपन गृह स्वच्छ ठेवावे.
* ग्रासरी व प्लॅचरी रोगापासून बचावासाठी निव्वळ व सुकलेल्या पानांचा वापर करावा.
पशुधन व्यवस्थापन
* जनावरांना सावलीत ठेवा, स्वच्छ व थंड पाण्याची सोय करा.
* वादळी वारा व पावसाच्या इशाऱ्यामुळे जनावरे उघड्यावर न ठेवता सुरक्षित निवाऱ्यात ठेवावीत.
* विजेपासून व धातूच्या वस्तूंपासून दूर ठेवावे.
(सौजन्य :मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
हे ही वाचा सविस्तर : Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर