Krushi Salla : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांची निगा राखण्यासाठी सज्ज व्हावे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार १३ सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारे, मेघगर्जना आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.(Krushi Salla)
कापूस, तूर, मका तसेच फळबागा व भाजीपाल्यांच्या शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पावसाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर कृषी सल्ला दिला आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन व गुणवत्तेत वाढ साधता येईल.(Krushi Salla)
हवामानाचा आढावा
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबर रोजी लातूर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना व मूसळधार पावसाची शक्यता.
आज (११ सप्टेंबर) रोजी नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडेल.
१२ सप्टेंबर रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल.
१३ सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड येथे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
१८ सप्टेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा कमी, तर तापमान सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे.
पीक व्यवस्थापन सल्ला
कापूस
रसशोषक किडी (फुलकिडे, तुडतुडे) आढळल्यास ५% निंबोळी अर्क, किंवा
फ्लोनिकॅमिड ५०% (८० ग्रॅम/एकर)
फिप्रोनिल ५% (६०० मिली/एकर)
डायनेटोफ्युरॉन २०% (६० मिली/एकर)
स्पिनेटोरम ११.७% (१६० मिली/एकर)
बुप्रोफेन्झीन २५% (४०० मिली/एकर) यापैकी एक किटकनाशक पावसाची उघडीप बघून फवारावे.
पातेगळ/बोंडगळ दिसल्यास NAA (२.५ मि.ली./१० लि. पाणी) फवारावे.
लागवडीनंतर ७५–८० दिवस झाले असल्यास १९:१९:१९ पाणीविद्राव्य खत १०० ग्रॅम/१० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
तूर
तण नियंत्रणासाठी अंतरमशागती करावी.
पाने गुंडाळणाऱ्या अळीकरिता ५% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५% (२० मि.ली./१० लि. पाणी) फवारणी करावी.
मूग/उडीद (Green Gram / Black Gram)
काढणीस तयार पिकाची वेळेवर काढणी करून कोरड्या जागी साठवणूक करावी.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास
इमामेक्टिन बेन्झोएट ५% (४ ग्रॅम/१० लि. पाणी) किंवा
स्पिनेटोरम ११.७% (४ मि.ली./१० लि. पाणी) फवारावे.
फवारणी करताना औषध कणसावर नीट पडेल याची दक्षता घ्यावी.
जोरदार पावसाच्या आधी ३ दिवस फवारणी टाळावी.
फळबाग व्यवस्थापन
केळी : झाडांना माती चढवून काठीचा आधार द्यावा. काढणीस तयार घड वेळेवर घ्यावेत.
आंबा : मँगो मॉलफॉर्मेशन व किड नियंत्रणासाठी पावसाची उघडीप बघून किटकनाशक फवारणी करावी. बागेत तणनियंत्रणासाठी अंतरमशागती करावी.
द्राक्ष : रोगग्रस्त पानांची विरळणी व शेंडा खोडणी करावी.
सिताफळ : पिठ्या ढेकूणावर निंबोळी तेल (५० मि.ली./१० लि. पाणी) किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (४० ग्रॅम/१० लि. पाणी) फवारावे.
भाजीपाला
काढणीस तयार भाजीपाला वेळेवर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
भेंडीवर फळ पोखरणाऱ्या अळीकरिता
लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.9CS (६ मि.ली./१० लि. पाणी) किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5SC (२.५ मि.ली./१० लि. पाणी) फवारावे.
फुलशेती
काढणीस तयार फुले वेळीच तोडून घ्यावीत.
शेतात तण न ठेवता फुलपिकात अंतरमशागती करावी.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांचे खाद्य स्वच्छ व कोरडे ठेवा.
पावसाळ्यात खाद्य नियोजन योग्य प्रकारे करावे.
शेळ्यांना जंतनाशक औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावीत.
संदेश : फवारणी, किटकनाशक किंवा अंतरमशागतीचे काम नेहमी पावसाची उघडीप बघूनच करावे.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)