Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कापूस, तूर, रब्बी ज्वारी, गहू तसेच फळबाग आणि भाजीपाल्यावरील थंडीचा परिणाम लक्षात घेऊन तज्ञांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवल्या आहेत. (Krushi Salla)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागात आगामी चार ते पाच दिवस हवामान पूर्णपणे स्वच्छ व कोरडे राहणार आहे.(Krushi Salla)
पुढील तीन दिवसांत किमान तापमानात किंचित घट जाणवेल; मात्र त्यानंतर तापमानात फारसा बदल होणार नाही. दिवसाचा उन्हाळा सौम्य तर रात्रीची थंडी काही प्रमाणात जाणवेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Krushi Salla)
या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने शेतकऱ्यांसाठी सविस्तर कृषी सल्ला जारी केला आहे.
तज्ज्ञ समितीचा महत्त्वाचा संदेश
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने सर्व पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन काळजीपूर्वक करावे. फळबाग, भाजीपाला व फुलबागांमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
पीक व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन
कापूस
वेचणीस आलेल्या कापसाची तातडीने वेचणी करून घ्यावी.
साठवणुकीपूर्वी कापूस नीट वाळवावा, अन्यथा प्रत कमी होऊ शकते.
तूर
शेंगा पोखरणाऱ्या अळीवर प्रभावी नियंत्रणासाठी
५% निंबोळी अर्क, किंवा
क्विनॉलफॉस २५% – २० मिली, किंवा
इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू न देण्यासाठी हलके पाणी द्यावे.
रब्बी ज्वारी
पेरणीनंतर १५–२० दिवसांनी पहिली कोळपणी करावी.
लष्करी अळीचा प्रादुर्भाव असल्यास :
इमामेक्टीन बेन्झोएट ५% – ४ ग्रॅम, किंवा
स्पिनेटोरम ११.७ एससी – ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना औषध पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
रब्बी सूर्यफूल
पेरणीनंतर २० दिवसांनी पहिली कोळपणी करावी.
गहू
पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
उशीरा पेरणी (१५ डिसेंबरपर्यंत) करता येते.
प्रति हेक्टरी बियाणे : १२५ - १५० किलो
सुचवलेली खत योजना
१५४ किलो १०:२६:२६ + ५४ किलो युरिया
किंवा ८७ किलो डीएपी + ५३ किलो युरिया + ६७ किलो एमओपी
किंवा ८७ किलो युरिया +२५० किलो एसएसपी + ६७ किलो एमओपी
राहिलेले अर्धे नत्र (८७ किलो युरिया) पेरणीनंतर २५-३० दिवसांनी द्यावे.
फळबाग व्यवस्थापन
केळी
थंडीपासून संरक्षणासाठी पहाटे मोकाट पद्धतीने पाणी द्यावे.
घड निसवले असल्यास सच्छिद्र पॉलिथिन पिशवीने घड झाकावेत.
बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.
आंबा
मोहोर चांगला लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये.
माल-फॉर्मेशन टाळण्यासाठी
एनएए - ४ मिली प्रति १० लिटर पाणी फवारावे.
फुलधारणा वाढवण्यासाठी
००:५२:३४ - १५ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारावे.
द्राक्ष
जिब्रलिक ॲसिड २० पीपीएमची फवारणी करावी.
सिताफळ
तयार फळांची काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी.
भाजीपाला
तण नियंत्रणासाठी खुरपणी करावी.
आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
तयार भाजीपाला तातडीने काढून घ्यावा.
नवीन लागवडींना खतमात्रा द्यावी.
फुलशेती
तण विरहित ठेवण्यासाठी खुरपणी करावी.
पिकास आवश्यक पाण्याचा पुरवठा करावा.
तयार फुले वेळेत काढणी करावी.
पशुधन व्यवस्थापन
थंडीपासून संरक्षणासाठी शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत.
कोंबड्यांच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक बल्ब लावावा.
पहाटेच्या थंड वाऱ्यात पशुधन बाहेर बांधू नये; गोठ्यात ठेवावे.
