Krushi Salla : मराठवाड्यात हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे.
शेतात पाणी साचू नये, रोग-किड नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी करावी आणि काढणीस आलेल्या पिकांची तातडीने काढणी करावी, असा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळालेल्या अंदाजानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात हलका ते मध्यम तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील कृषी सल्ला लक्षात घ्यावा.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन
पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या.
दीर्घकाळ ओलावा राहिल्यास दाणे कुजणे, शेंगा तुटणे-फुटणे अशी समस्या होऊ शकते.
रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा यांसारखे रोग दिसल्यास टेब्युकोनॅझोल + सल्फर किंवा इतर शिफारस केलेले बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे.
कापूस
अतिरिक्त पाणी त्वरित काढून टाकावे.
आकस्मिक मर किंवा मूळकूज झाल्यास युरिया + पांढरा पोटॅश + कॉपर ऑक्सिक्लोराईड यांचे द्रावण आळवणीस वापरावे.
आतल्या/बाह्य बोंडसड टाळण्यासाठी शिफारस केलेले बुरशीनाशक वापरून फवारणी करावी.
तूर
पाणी साचल्याने फायटोप्थेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो.
यासाठी मेटालॅक्झील + मॅन्कोझेब किंवा ट्रायकोडर्मा यांचा फवारणी व आळवणीत वापर करावा.
ज्वारी, ऊस व हळद
शेतात पाणी साचू देऊ नका.
हळदीत कंदकुज दिसल्यास कार्बेंडॅझीम, मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड यापैकी एकाचा वापर करून आळवणी करावी.
फळबाग व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी : फळवाढीसाठी ००:५२:३४ खत + जिब्रॅलिक ॲसिड मिसळून फवारणी करावी.
डाळिंब : अतिरिक्त फुटवे काढून टाकावेत व पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
चिकू : काढणीस तयार फळे तोडून सुरक्षित ठिकाणी साठवावी.
भाजीपाला व फुलशेती
शेतात पाणी साचू देऊ नका.
काढणीस तयार पिकांची वेळेवर काढणी करावी.
पशुधन
वादळी वारा व पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जनावरांना उघड्यावर न सोडता निवाऱ्यात बांधावे.
पशुखाद्य कोरडे व स्वच्छ ठेवावे.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटक संगापनानंतर तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर ६ टन तर हेक्टरी १५ टन पर्यंत शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी १६ X ८ X ४ फुट आकाराच्या दोन खड्डयात ६ महिने तुतीचे शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.
सर्व शेतकऱ्यांना आवाहन
पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणी व आळवणीची कामे पावसाची उघाड आणि वापसा बघूनच करावीत. शेतात पाणी साचणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी.
(सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)