Agriculture News : कोबीवर्गीय पिकांवरील मावा (Aphids) ही एक महत्त्वाची रसशोषक कीड असून, ती कोवळी पाने खाऊन पिकाचे नुकसान करते, ज्यामुळे पाने पिवळी पडून सुरकुततात व त्यांच्यावर काळी बुरशी वाढते. या किडीची लक्षणे काय आहेत, उपाय काय करावेत हे समजून घेऊयात....
कोबीवर्गीय पिके- मावा
- सध्याचे थंड आणि मधूनच ढगाळ होणारे वातावरण मावा प्रादुर्भावास अनुकूल आहे.
- हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरसाचे शोषण करतात.
- त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात आणि वाळून जातात.
- मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात.
- हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात.
- त्यानंतर या पदार्थावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
- झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते.
व्यवस्थापन
- मावा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीला पोहचल्यास, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडूनिंबावर आधारित कीडनाशक अझाडिरॅक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- या फवारणीमुळे मावा किडीचे प्रमाण कमी होते व मित्र किटकांचे संवर्धन होते.
- जैविक कीटकनाशकांमध्ये व्हर्टिसिलीअम लेकॅनी किंवा मेटॅन्हायझीयम ॲनिसोप्लीची २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
- गरज पडल्यास व जैविक नियंत्रण केले नसल्यास आणि प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे गेल्यास, रासायनिक कीटकनाशक मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळन फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
