गडचिरोली : जिल्हा परिषदेने महिला सक्षमीकरण आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन खरेदीसाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या 'नमो ड्रोन दीदी' योजनेच्या तसेच राज्य कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांना ड्रोन तंत्रज्ञानाने सुसज्ज करून अतिरिक्त उत्पन्न मिळवणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे असा उद्देश आहे.
ड्रोन खरेदीसाठी किमतीच्या ६५ टक्के पर्यंत किंवा जास्तीत जास्त ५ लाख रुपये अनुदान मिळू शकते. इच्छुक महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अधिकृत सूचना, मार्गदर्शक तत्त्वे व अर्जाची अंतिम मुदत जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी केले आहे.
विविध लाभार्थ्यांसाठी अनुदानाचे स्वरूप :
शेतकरी, FPO आणि सहकारी संस्था :
अनुदान: ६५ टक्के (जास्तीत जास्त ५ लाख रुपये प्रति ड्रोन).
महिला बचत गट :
योजना : नमो ड्रोन दीदी योजना.
अनुदान: ६५ टक्के (जास्तीत जास्त ५ लाख रुपये प्रति ड्रोन)
उद्दिष्ट : महिला बचत गटांना ड्रोन भाड्याने देण्यास सक्षम करणे
कृषी पदवीधर (कस्टम हायरिंग सेंटरसाठी):
अनुदान : ५० टक्के (जास्तीत जास्त ५ लाख रुपये प्रति ड्रोन).
अर्ज कसा करावा :
या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला Mahadbt या कृषी विभागाच्या पोर्टलवर जावे लागेल.
तुम्हाला ड्रोन खरेदीसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत (SMAM) अर्ज करावा लागेल.
अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा.
Read More : परदेश अभ्यास दौऱ्यासाठीचे अनुदान वाढले, आता प्रति शेतकरी इतके रुपये मिळतील