Draksh Bag Chatani : लवकर छाटणी केलेल्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापनासाठी वेलीला पाऊस सुरू होण्यापूर्वी काडी पूर्णपणे परिपक्व होणे महत्त्वाचे असते, यासाठी आर्द्रता नियंत्रणात ठेवावी लागते.
यासाठी उशिराचा पाऊस आणि वाढत्या आर्द्रतेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेलीची काळजी घ्यावी लागते, जसे की पानांची आणि फळांची व्यवस्थित वाढ व सतेजपणा राखणे, तसेच घड जिरणे रोखण्यासाठी योग्य फवारण्या करणे, आदी कामे करावी लागतात.
लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागेतील व्यवस्थापन
- या बागेत सध्या प्री ब्लूम अवस्थेत द्राक्ष घड दिसून येतील. प्री ब्लूम अवस्थेतील पोपटी रंग आलेल्या घडास १० पीपीएम जीए ३ ची फवारणी फायद्याची राहील.
- द्रावणाचे चांगले परिणाम मिळण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याचा सामू ६.५ ते ७ असावा.
- तर द्रावणाचा सामू हा ५.५ ते ६ इतका असावा. असे नियोजन केल्यास दोन पाकळ्यांतील अंतर व पाकळीची लांबी वाढण्यास मदत होईल.
- हा सामू मिळण्यासाठी द्रावणामध्ये युरिया फॉस्फेट किंवा सायट्रिक अॅसिड वापरता येईल.
- यावेळी जीएचे विशेष कार्य म्हणजे पेशींची संख्या व आकार वाढवणे होय.
- जीएची दुसरी फवारणी करायची झाल्यास १५ पीपीएम जीए पहिल्या फवारणीच्या पाच दिवसांनंतर करावी.
- फवारणीचे चांगले परिणाम मिळण्यामध्ये तापमान आणि आर्द्रता यांची भूमिका महत्त्वाची असते.
- सायंकाळी चार वाजल्यानंतर फवारणी केल्यास आर्द्रता योग्य असल्यामुळे जीएचे शोषण करण्याची पानांची क्षमता वाढते.
- जीएची फवारणी करण्याआधी एक दिवस आधी झिंक आणि बोरॉन प्रत्येकी अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी केल्यास पानांची जीए शोषण्याची क्षमता वाढते.
- या वेळी वातावरण कोरडे असल्यामुळे रोग व कीड नियंत्रणासाठी उपलब्ध असलेले बुरशीनाशक व कीडनाशक संजीवकासोबत मिसळणे टाळावे.
(सोसाट्याचा वारा व पावसाचा अंदाज घेवुनच पिकावर कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची फवारणी करावी)
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी