भंडारा : सद्यस्थितीत धानपीक फुलोरा व लोंबी भरण्याचे अवस्थेत आहे. भारी धान गर्भावस्थेत व फुलोऱ्यावर आहे. अशास्थितीत धान पिकावर करपा, कडा करपा, पर्णकोष करपा या रोगांचा तसेच खोडकिडा, तपकिरी तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
या कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यास धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कीड रोग नियंत्रणाकरिता वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पवनी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांनी सांगितले आहे.
तुडतुडा, खोडकिडी नियंत्रणासाठी उपाययोजना
- खोडकिडा नियंत्रणाकरिता क्लोरोपायरीफॉस ५० टक्के इ.सी., १५ मिली किंवा फ्लूबेंडामाईड २० डब्ल्यूजी २.५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास बांधातील पाणी सोयीनुसार तीन ते चार दिवसांसाठी बाहेर काढावे.
- नियंत्रणाकरिता मेटारायझियम अनिसोप्ली जैविक बुरशी २.५ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे बांधीत सोडावे.
- रासायनिक औषधांचा वापर करावयाचा असल्यास बुप्रोफेझिन २५ टक्के प्रवाही १६ मिलि किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एस. एल. २ मिलि किंवा फ्लोनिकामिड ५० टक्के, ३ ग्रॅम किंवा फिप्रोनिल किंवा थायोमिथोक्झाम यापैकी कोणतीही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
करपा व कडा-करपा रोगासाठी उपाययोजना
- करपा रोग हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास टेबुकोनाझोल २५.९ टक्के इ. सी. १५ मिलि किंवा पिकोझिस्ट्रॉबिन २२.५२ टक्के, एस. सी. १० मिलि यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- कडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कॉपर हायड्रोकसाइड ५३.६ टक्के डी. एफ. ३० ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
- काही भागात धान पिकावर दाणे रंगहीन झालेले दिसून येत आहे.
- असल्यास प्रोक्लोराझ ३४.८ टक्के, अधिक प्रोपीकोनाझोल ७.८ टक्के, इ. सी. किंवा डायसायक्लाझोल २०.४ टक्के, अधिक अजॉक्सिस्ट्रॉबिन ६.८ टक्के. एस. सी. २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे रोगांचा वेळीच नायनाट होण्यास मदत मिळेल.
Soyabean Market : ऑक्टोबर 2025 मध्ये सोयाबीनचे सरासरी दर कसे राहतील, वाचा सविस्तर