Cotton Crop Management : कपाशी पिकावर सध्यस्थितीत काही भागात तंबाखुची पाने खाणारी अळी (Spodoptera litura) यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. (Cotton Crop Management)
अकोट तालुक्यातील दिनोडा, रोहनखेड, भांबुर्डा, अंतरगाव, वरूड-जऊळका, इसापूर या गावांमध्ये या किडीमुळे आर्थिक नुकसान पातळीवर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. (Cotton Crop Management)
शेतकरी याविषयी सजग राहणे आणि नियोजनबद्ध नियंत्रण उपाययोजना करणे आवश्यक आहे.(Cotton Crop Management)
अळीची ओळख
वैज्ञानिक नाव: स्पोडोप्टेरा लिदुरा ( Spodoptera litura)
पतंगाची लांबी: सुमारे २२ मिमी
पंख: सोनेरी व करड्या-तांबड्या रंगाची
अंडी: मादी पतंग पानाच्या खालच्या बाजूला पुंजक्यात ८० ते १०० अंडी घालते; एक मादी सरासरी ३००–४०० अंडी घालते.
जीवनचक्र
अंडी अवस्था: ३–४ दिवस
अळी अवस्था: २१–२२ दिवस
कोषावस्था: ९–१० दिवस (३–१० से. मी. खोलीत)
प्रौढ अवस्था: ६–७ दिवस
एक पिढी पूर्ण होण्यासाठी ३२–४० दिवस लागतात.
नुकसानाचा प्रकार
तंबाखुची पाने खाणारी अळी मुख्यत्वे पानांचे हरितद्रव्य मागील बाजूने खातात. सुरुवातीला पाने जाळीदार होतात, नंतर मोठ्या प्रमाणात पाने, शेंडे, फुले, पात्या आणि बोंडे पोखरून खातात. या बहुभक्षीय किडीमुळे पिकाचे उत्पादन गंभीरपणे कमी होते.
नियंत्रणासाठी उपाययोजना
प्रतिबंधात्मक उपाय
तण नियंत्रण: बांधावरील तणांची नियमित सफाई करावी, कारण ते या किडीच्या वाढीस कारणीभूत ठरतात.
पक्षी थांबे: हेक्टरी क्षेत्रात १५–२० पक्षी थांबे लावावे. पक्षी या अळया खातात आणि नैसर्गिक नियंत्रण साधतात.
ग्रस्त पाने नष्ट करणे: अळीग्रस्त पाने किंवा पुंजके तोडून त्यासह जाळून नष्ट करणे आवश्यक आहे.
सर्वेक्षण सापळे: प्रत्येक हेक्टरी क्षेत्रात किमान १० कामगंध सापळे लावावेत.
रासायनिक उपाय
जर सापळ्यात दररोज ८–१० पतंग २–३ दिवस सतत दिसल्यास रासायनिक नियंत्रण करणे आवश्यक आहे.
खालील किटकनाशकांचे फवारणी प्रमाण वापरावे:
क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ६० मिली प्रति एकर किंवा
स्पिनोटोरम ११.७० टक्के एससी २०० मिली प्रति एकर किंवा
सायंट्रानिलीप्रोल १०.२६ ओडी ३७५ मिली प्रति एकर किंवा
क्लोरोपायरीफॉस ५० टक्के ईसी + सायपरमेथ्रीन ५ टक्के ईसी ४०० मिली प्रति एकर
यापैकी कोणत्याही एक किटकनाशकाची फवारणी करावी.
शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
* फवारणी करताना सुरक्षित उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
* रासायनिक नियंत्रण करताना फवारणी वेळ आणि प्रमाण पिकाच्या वयावर अवलंबून ठरवावी.
* एकाच ठिकाणी सतत रासायनिक फवारणी टाळावी, विविध नियंत्रण पद्धतींचा अवलंब करावा.
* पिकाच्या उत्पादनाच्या सुरुवातीपासून नियमित निरीक्षण करणे गरजेचे आहे.
तंबाखुची पाने खाणारी अळी एक जलद प्रादुर्भाव करणारी किड आहे, ज्याचा नियंत्रण योग्य वेळी न केल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होतो.
शेतकऱ्यांनी या किडीच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण, जैविक उपाय, योग्य रासायनिक नियंत्रण या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
- डी. बी. उंदिरवाडे, विभाग प्रमुख, किटकशास्त्र विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला