अंजीर हे समशीतोष्ण कटिबंधातले आणि ऊन-थंडी सहज सहन करणारे फळझाड आहे. ते उंबर, वड, पिंपळ या कुळातील आहे.पोषण, औषधी आणि व्यापारी दृष्ट्या हे फळ अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
याचा अन्नमूल्य निर्देशांक ११ असून, तो सफरचंदापेक्षाही जास्त आहे. अंजिरात साखर, लोह, कॅल्शियम, तांबे तसेच 'अ' आणि 'ब' जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. या फळात आम्लतेचे प्रमाण नगण्य असल्याने त्याची चव गोड असते. ताज्या फळात सुमारे८४% गर असतो, ज्यामुळे हे फळ आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आहार घटक ठरते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने (राहुरी) विकसित केलेला 'फुले राजेवाडी' हा वाण कमी पाण्यावर उत्तम उत्पादन देतो, ज्यामुळे तो दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर पर्याय ठरला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सोलापूर आणि छ. संभाजीनगरसारख्या मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या प्रदेशात या पिकाची लागवड यशस्वी ठरली आहे. 'फुले राजेवाडी' हे वाण 'पुना अंजीर' जातीमधून निवड पद्धतीने विकसित केले गेले आहे.
जागतिक स्तरावर तुर्की हा देश अंजिराचा (सुमारे २६%) प्रमुख उत्पादक असून, अमेरिका, ग्रीस आणि स्पेन सारखे देश सुके अंजीर तयार करण्यासाठी ओळखले जातात.
अंजीर लागवडीसाठी हवामान आणि जमीन
* हवामान: अंजिरासाठी कोरडे आणि उष्ण हवामान उत्तम असते. ज्या भागात सरासरी२५ इंच (६२५ मिमी) पाऊस पडतो आणि तो सप्टेंबर/ऑक्टोबरमध्ये थांबतो, तेथील हवामान अनुकूल आहे. फळांची वाढ होत असताना तापमान ३५ ते ३७°C पेक्षा कमी असणे आणि पावसाचा अभाव असणे, हे चांगल्या दर्जाच्या फळांसाठी आवश्यक आहे.
* जमीन: तांबूस रंगाच्या चिकण मातीची आणि पृष्ठभागाखाली ३-४ फूट (०.९ ते १.२ मी.) मुरमाचा थर असलेली जमीन उत्कृष्ट मानली जाते. अंजिराची मुळे साधारण ३ फूट (०.९ मी.) खोल जातात, त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी आणि मध्यम ओल टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. अति काळी माती या पिकासाठी योग्य नसते.
अभिवृद्धी, लागवड आणि निगा
* अभिवृद्धी : अंजिराची अभिवृद्धी प्रामुख्याने फाटे कलम लावून केली जाते. यासाठी ८ ते १२ महिने वयाच्या, अर्ध्या इंचापेक्षा कमी जाडीच्या फांद्या निवडून, त्या गादी वाफ्यावर ३० सेंमी अंतरावर लावतात. गुटी कलमानेदेखील याची अभिवृद्धी करता येते.
लागवड
अंतर: हलक्या ते मध्यम जमिनीत ४.५ x ३ मी. (प्रति हेक्टर ७४० झाडे) आणि भारी जमिनीत ५ x ५ मी. (प्रति हेक्टर ४०० झाडे) अंतर ठेवावे.
खड्डे भरणे:१ x १ x १ मी. आकाराचे खड्डे घेऊन त्यात बोनमील (१ किलो) किंवा सुपर फॉस्फेट (१.५ किलो), क्लोरोफॉस पावडर (५० ग्रॅम) आणि २०-३० किलो कुजलेले शेणखत व पोयट्याची माती यांचे मिश्रण भरून घ्यावे.
वळण आणि निगा
झाडे लहान असताना बुंध्यातून निघणारे अनावश्यक फुटवे काढून टाकावेत. जमिनीपासून ३ फूट उंचीपर्यंत बुंधा मोकळा ठेवून, त्यानंतर ३-४ मुख्य फांद्या ठेवून त्यांना सर्व बाजूंनी पसरणारे वळण द्यावे. खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास झाड वाचवण्यासाठी ३-४ खोडे ठेवणे फायदेशीर ठरते.
आंतरपिके: पहिल्या दोन-तीन वर्षांपर्यंत रिकाम्या जागेत शॉर्ट टर्म हिरवळीची पिके (उदा. ताग, धैंचा) किंवा द्विदल पिके (उदा. मूग, उडीद, सोयाबीन) घेता येतात.
बहार व्यवस्थापन आणि छाटणी
बहार: अंजिराला वर्षातून दोन वेळेस बहार येतो
खट्टा बहार (पावसाळी) :
मे महिन्याच्या अखेरीस छाटणी करून जूनच्या पहिल्या आठवड्यात खते व पाणी दिले जाते.याची फळे ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान तयार होतात. ज्या भागात पाण्याची उपलब्धता कमी आहे, तेथे हा बहार घेतला जातो.
मीठा बहार (उन्हाळी):
सप्टेंबर महिन्यात छाटणी व मशागत करून खते व पाणी दिले जाते. याची फळे मार्च-एप्रिलमध्ये तयार होतात.
छाटणी:
अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी दरवर्षी छाटणी करणे आवश्यक आहे. बहाराप्रमाणे मे अखेरीस (खट्टा बहार) किंवा सप्टेंबरमध्ये (मीठा बहार) फांदीचा जोर पाहून १/३ किंवा १/२ आखूड छाटणी करावी. छाटणीमुळे राहिलेल्या डोळ्यांतून नवीन फूट येते, ज्यावर फळे लागतात.
बहार नियोजनातील महत्त्वाचे मुद्दे
* पाणी सुरू करताना खोडावर/फांद्यांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हायड्रोजन सायनामाईड या संजीवकाची फवारणी/चोळण करावी, ज्यामुळे सर्व सुप्त डोळे फुटतात.
* एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करावा आणि बागेत सतत ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
* सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर (उदा. फळे भेगाळत असल्यास बोरॉन) करून फळांचा टिकाऊपणा वाढवावा.
अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन
* अन्नद्रव्य : पूर्ण वाढलेल्या झाडाला बहार धरताना५० किलो कुजलेले शेणखत, तसेच नायट्रोजन (११२५ ग्रॅम), स्फुरद (३२५ ग्रॅम) आणि पालाश (४१५ ग्रॅम) प्रति झाड मातीत मिसळून द्यावे. स्फुरद आणि पालाशची पूर्ण मात्रा, तर नायट्रोजनची अर्धी मात्रा प्रथम द्यावी आणि उरलेली अर्धी मात्रा एका महिन्याच्या अंतराने द्यावी.५ किलो निंबोळी पेंडप्रति झाड प्रति वर्षी देणे आवश्यक आहे.
* पाणी व्यवस्थापन : जमिनीच्या मगदुराप्रमाणे भारी जमिनीत ७-८, मध्यम जमिनीत ५-६ आणि हलक्या जमिनीत ३-४ दिवसांनी संरक्षणात्मक पाणी द्यावे. फळवाढीच्या काळात पाण्याचा ताण बसू नये, पण जमिनीत जास्त ओलावा राहिल्यास फळे भेगाळतात. ठिबक सिंचन वापरल्यास ६०-७०% पाण्याची, तसेच खते पाण्यातून देता येत असल्याने २५-३०% खतांची बचत होते आणि तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
फळांची काढणी आणि उत्पादन
* उत्पादन कालावधी: अंजिराच्या झाडाला लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येऊ लागतात. मात्र, चौथ्या-पाचव्या वर्षापासून उत्पादन वाढतेआणि त्यानंतर साधारणपणे १५ ते २० वर्षांपर्यंत बाग नियमितपणे भरपूर उत्पादनदेते. त्यानंतर हळूहळू झाडाची उत्पादन क्षमता कमी होते.
* फळ पिकण्याची ओळख: फळ पिकताना त्याचा हिरवा रंग जाऊन फिकट हिरवा, अंजिरी, विटकरी किंवा लालसर जांभळारंग येतो. फळाचा कडकपणा जाऊन ते मऊ होते.
* काढणीची पद्धत: तयार झालेली फळेदेठ हाताने पिरगळून किंवा चाकूने छाटून काढली जातात. फळांची काढणी दररोज करावी लागते.
* सरासरी उत्पादन: योग्य निगा राखल्यास, एका झाडापासून सरासरी २५ ते ३० किलो उत्पादन मिळते.
काढणीनंतरचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया
* टिकाऊपणा : अंजीर फळे अतिशय नाशवंत (Perishable) असल्याने ती जास्त दिवस टिकत नाहीत. पूर्ण पिकलेली फळे लवकर खराब होतात.बाहेर गावी पाठवण्यासाठी फळे किंचित अपक्व (अपेक्षित पिकण्यापेक्षा कमी पिकलेली) काढावी लागतात.
* वाहतूक : दूरगावी पाठवण्याची फळे बांबूच्या हलक्या पण मजबूत टोपलीत किंवा कोरुगेटेड पेपर बॉक्समध्ये (Corrugated Box) पाठवली जातात. वाहतूक करताना अंजिराच्या पानांचे थर आणि फळांचे थर असे एकावर एक थर देऊन टोपली/खोका भरण्याची पद्धत आहे.
* प्रक्रिया (Processing) : फळे नाशवंत असल्याने काढणीनंतर शक्य तितक्या लवकर त्यांची विक्री करावी लागते किंवा त्यावर प्रक्रिया करावी लागते. अंजिरापासून सुके अंजीर (Dry Fig), जॅम (Jam), अंजीर पोळी, बर्फी, सिरप (Syrup), सरबत/पेय (Beverages) प्रक्रिया केलेले पदार्थ तयार करता येतात. या प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते.
‘फुले राजेवाडी’ वाणाची वैशिष्ट्ये
* फळे – आकर्षक अंजिरी रंगाची
* फळाचे वजन – ६५ ते ७० ग्रॅम
* फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण – १८ ते २०टक्के
* गराचे अधिक प्रमाण – ८५ ते ८८ टक्के
* उत्पादन: पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सरासरी ८५ ते ९० किलो
कलमे उपलब्धता :
* महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी.
* राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे.
- डॉ. प्रदीप दळवे, उद्यानविद्यावेत्ता - ८९८३३१०१८५
- डॉ. युवराज बालगुडे
- सुनील नाळे
(लेखक अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सिताफळ) संशोधन प्रकल्प,जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे येथे कार्यरत आहेत.)
