Agriculture News : जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा उपयोग केला जातो. गव्हाचा भुसा, साळीचे तणिस, ज्वारीचा टाकाऊ कडबा, उसाचे पाचट (Usache Pachat) किंवा कोणत्याही पिकाचे टाकाऊ काड, झाडाचा पाला-पाचोळा या सर्व वस्तूंचा आच्छादनासाठी वापर करता येतो. पॉलिथिन पेपर किंवा प्लॅस्टिक, काही रासायनिक द्रव्ये, लहान-मोठे दगड किंवा मातीसुद्धा आच्छादनासाठी वापरता येते.
फळझाडांमध्ये आच्छादन (Agriculture News) टाकल्याने बुंध्याजवळची जमीन झाकली जाते. जमिनीला वातावरणातील उष्णता मिळण्यास अडथळा होतो आणि त्यामुळे बाष्पीभवन बहुतांशी कमी होते. आच्छादनाने जमिनीचा जेवढा जास्तीत जास्त भाग झाकला जाईल, तेवढ्या जास्त प्रमाणात पाण्याची बचत होते. उन्हाळी हंगामात (Summer Season) फळझाडांची पाण्याची गरज प्रति दिवशी प्रत्येक झाडांसाठी सुमारे 30 लिटरपर्यंत वाढते.
यापैकी बरेचसे पाणी बाष्पीभवनामुळे जमिनीतून हवेत शोषले जाते. आच्छादनाचा वापर करून उन्हाळी हंगामात पाण्याची कार्यक्षमता वाढविता येते तसेच पाण्याचा बाष्पीभवणाद्वारे होणारा अपव्यय कमी होतो. आच्छादन पांढऱ्या रंगाचे असेल तर तापमान कमी होते व पाण्याची बचत वाढते. आच्छादन काळया रंगाचे असेल तर तापमान ५ ते ८ अंश सेल्सिअसने वाढते.
प्लास्टिक किंवा पॉलिथिन पेपर वापरल्यासही तापमान वाढते. आच्छादन कमी प्रमाणात टाकल्यास बाष्पीभवनास कमी प्रमाणात आळा बसतो. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात आच्छादन घातल्यास फळझाडांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती २ ते ५ सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा तसेच फळझाडांमधील अंतरानुसार एकरी ५ ते ७ टन आच्छादनाचा वापर करावा. शक्यतो आच्छादनासाठी उसाच्या पाचटाचा वापर करावा. हेच पाचट पुढील हंगामात जमीन नांगरणीबरोबर गाडल्यास त्याचे खत म्हणून चांगला फायदा होतो.
- डॉ. कल्याण देवळाणकर, सेवा निवृत्त कृषी विद्यापीठ शास्रज्ञ