Bamboo Live Fences : शेतशिवार तसेच प्रक्षेत्राच्या सिमेवर मोकाट गुरे, वन्यप्राणी, आगंतुक यांचा प्रक्षेत्रावर प्रवेश थांबविण्यासाठी बांबू करवंद, अगेव व अन्य सजिव वनस्पतींची एक किंवा अनेक ओळीत विशिष्ट रचना व लागवड करुन वाढविलेल्या कुंपणास सजिव कुंपण म्हणतात.
सजिव कुंपणाचे अनेक फायदे असून ते बांबू सारख्या बहुउपयोगी वनस्पतीचे असल्यास चार ते पाच वर्षात शेतकऱ्याला परिपक्व बांबूच्या विक्री मधून प्रति १०० बांबू वेटापासून १२ हजार ५०० रुपये ते २० हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे. बांबूचे कुंपण एकदा तयार झाल्यावर ते ३५ ते ४० वर्ष कायम राहत असते व त्यापासून प्रतिवर्षी उत्पन्न मिळत राहते.
बांबू हे ३० ते ५० मीटर उंच वाढणारी वनस्पती असून सुरुवातीची दोन वर्षे काळजी घ्यावी लागते. त्यानंतर ओलीत, रोगराई व देखरेख यासारख्या कामावर खर्च करण्याची आवश्यकत्ता नसते. बांबूची लागवड केल्यावर त्याचे बेट तयार होते. ते दीड ते दोन मीटर पर्यंत चारही बाजुस पसरते. त्यामुळे सजिव कुंपण तयार होते. बांबूच्या फांद्या एकमेकात मिळतात व वाट कुंपण तयार होते.
त्यामधून लहान वन्यप्राणी जसे रानडुक्कर, हरिण, सायाळ व शेळ्या, मेंढया यांचा प्रवेश टाळता येतो. तसेच, बांबूचे सजीव कुंपण ३० ते ५० फुट उंच असल्याने मोठे जंगली प्राणी जसे निलगाय, रोही, सांबर, हत्ती, माकड, गाय, म्हैस, घोडे ई यांचा प्रवेश टाळता येतो.
सजीव कुंपण म्हणून बांबूची लागवड केल्यास शेत जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. बांबूच्या पालापाचोळयापासून सेंद्रिय खत तयार होते, जमिनीची धूप थांबते, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, शेताचे सीमांकन होते व यासारखे प्राकृतिक फायदे होतात.
बांबूचे सजिव कुंपण तयार करण्यासाठी पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा. ओलिताची सोय असलेल्या शेतावर पावसाळा व हिवाळा (जुलै ते डिसेंबर) या महिन्यात लागवड करता येईल. कोरडवाहू शेतीत व हमखास पावसाचे प्रदेशात जुलै ते ऑगस्ट या महिन्यात लागवड पूर्ण करावी.
- मध्यम ते कमी पावसाव्या प्रदेशात जुलै महिन्यात लागवड पुर्ण करावी. वरील दोन ते तीन स्थितीमध्ये लागवडीपासून सुरुवातीचे दोन वर्ष उन्हाळयात आठवडयाला एक असे प्रति झाड १० ते १२ लिटर पाणी द्यावे.
- गड्डे तयार करणे उथळ मध्यम खोलीच्या जमिनीवर ४५ सेंटीमीटर पर्यंत ३० ते ४५ सेंटीमीटर खोल व ४५ सेंटीमीटर रुंद खड्डे तयार करावे (४५ x ४५ x ४५ सेंटीमीटर) जास्त खोलीच्या जमिनीवर ३० सेंटीमीटर खोल पर्यंत खड्डा तयार करावा व रुंदी ३० से. मी. असावी (३०४३०४३० सें. मी)
- शेतासभोवती १ मीटर रुंद व १ मीटर खोल चर खोदून त्यामध्ये लागवड केल्यास उत्तम प्रतीचे व जास्त कार्यक्षम कुंपण अल्पावधीत (तीन वर्षात) तयार होते. लागवडीचे अंतर शेतासभोवती उपलब्ध जागेच्या रुंदीनुसार कुंपणातील ओळींची संख्या ठरवली जाते.
- शेतासभोवती ३ ते ४ मीटर जागा उपलब्ध असल्यास बांबूच्या एका ओळीची लागवड करावी. यासाठी दोन रोपांमधील अंतर १ ते १.५० मीटर ठेवावे.
- शेतासभोवती ५ ते ७ मीटर जागा उपलब्ध असल्मास दोन ओळीत मागे पुढे (Staggered) पध्दतीने रोपांमधील अंतर २ मीटर ठेवून बांबूची लागवड करावी.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अखिल भारतीय समन्वयीत कृषि वनशेती संशोधन प्रकल्प, कृषि महाविद्यालय, नागपूर
