Agriculture News : सद्यस्थितीत उन्हाळ बाजरी वाढीच्या (Unhal Bajari) अवस्थेत असून या पिकासाठी पाणी व्यवस्थापन, तसेच गहू पीक (Wheat Crop) काही भागात पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी कापणी सुरु झाली आहे. शिवाय रब्बी मका (Maize Crop) पीक पक्वतेची अवस्था, कापणी अवस्थेत आहे. या तिन्ही पिकांसाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्राकडून सल्ला देण्यात आला आहे.
उन्हाळ बाजरी पाणी व्यवस्थापन
जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
गहू पक्वतेची अवस्था, कापणी अवस्था
- वेळेवर पेरलेल्या गव्हाची काढणी व मळणी करावी.
- गहू पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस अगोदर पिकाची कापणी केल्याने गव्हाचे दाणे शेतात झडण्याचा प्रकार आढळत नाही.
- गहू पिकाची काढणी सकाळच्या वेळेस करावी.
- गव्हाची मळणी यंत्राच्या सहय्याने करावी किंवा कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करावी.
- मळणी करतांना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला जास्त काळ उष्ण तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
- त्यामुळे या पिकाला दर पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- म्हणजे एकूण काळात पाण्याच्या ५ पाळ्या (नियमित ४ अधिक अतिरिक्त १) द्याव्या लागतील.
- पाण्याच्या दोन पाळ्यांदरम्यान जास्त अंतर राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
- कारण जमीन कोरडी पडल्यास उंदरांचा त्रास होण्याची शक्यता असते.
रब्बी मका पक्वतेची अवस्था, कापणी अवस्था
- कणसे पिवळसर, दाणे कडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावीत.
- ही कणसे दोन ते तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत.
- त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत. दाण्यांतील पांढरी तुसे, बिट्ट्याचे तुकडे वेगळे करण्यासाठी उफनणी करावी.
- दाणे चांगले उन्हात वाळवून दाण्यांतील आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत ठेऊन साठवण करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी