सध्या केळी पिकावर बुरशीजन्य (Banana Fungal Disease) करपा रोगाचा अटॅक झालेला आहे. त्यामुळे पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके पडले आहेत. या बुरशीजन्य रोगामुळे पाने सुकतात व केळीची प्रतवारी खराब होते.
वेळीच व्यवस्थापन न केल्यास सरासरी उत्पादन कमी येण्याची शक्यता असल्याचे 'पीकेव्ही'च्या वनस्पती रोगशास्त्र विभागाने सांगितले.
धामणगाव रेल्वे, अंजनगाव सुर्जी, पांढरी, खानापूर, पथ्रोट आदी भागांत केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या या केळी पिकावर काही भागांत करपा रोग (Karapa Disease) आढळला आहे.
रोगग्रस्त पानावर पिवळ्या रंगाचे लांबट गोल ठिपके दिसतात व ठिपके वाळून तपकिरी काळपट होतात आणि त्याच्याभोवती पिवळसर वलय तयार होते. तीव्र प्रादुर्भाव असल्यास पाने सुकतात. त्यामुळे गुणवत्ता कमी होते.
लैंगिक बीजफळ खालच्या पानांच्या थरात उगवतात आणि हवेमार्फत निरोगी झाडापर्यंत पोहोचतात. अलैंगिक बीजफळ पावसाचे थेंब किंवा वाहत्या पाण्याद्वारे प्रसारित होतात. रोगाचा प्रसार दमट व ओलसर वातावरणात तीव्र होत असल्याचे या विभागाने सांगितले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी केळीवरील करपा रोगावर काही उपाययोजना दिल्या आहेत.
असे करा व्यवस्थापन
* ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, बागेत पाणी साचून राहणार नाही, निचरा होईल, याची काळजी घ्यावी.
* मुख्य खोडाला लागून येणारी पील नियमित कापावी, रोगग्रस्त पानाचा भाग काढून बागेबाहेर खड्ड्यात पुरावा.
ही करावी फवारणी
संयुक्त बुरशीनाशक मेटीराम ५५ टक्के अधिक पायराक्लोस्टोबिन ५ टक्के डब्ल्यू. जी. ग्रॅम किंवा पायराक्लोस्टोबीन १३३ जी/एल अधिक इपोक्सिकोनाझोल ५० जी/एल एसई १.५ ग्रॅम किंवा मॅनकोझेब ७५ टक्के डब्ल्यू, पी. ३ ग्रॅम किंवा पायराक्लोस्टोबिन २० टक्के डब्ल्यू, जी. १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.