Join us

मधुमेहाला दूर ठेवायांचय तर मग भरडधान्ये खाच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 11:52 AM

जागतिक स्तरावर भरडधान्यांचे उत्पादन आणि वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. भरडधान्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्य संवर्धनात भरडधान्यांची मदत अशा मुद्द्याबाबत आहारतज्ज्ञ डॉ. अभिषेक माने यांच्याशी साधलेला हा संवाद.

जागतिक स्तरावर भरडधान्यांचे उत्पादन आणि वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारताच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. भरडधान्यांचे आहारातील महत्त्व, आरोग्य संवर्धनात भरडधान्यांची मदत अशा मुद्द्याबाबत आहारतज्ज्ञ डॉ. अभिषेक माने यांच्याशी साधलेला हा संवाद.

भारतामध्ये विविध प्रकारची भरडधान्ये, त्यांच्या जाती आणि वाण आढळतात, मात्र विविध कारणांमुळे देशभरातील ही भरडधान्ये काळाच्या पडद्याआड जात आहेत. वास्तविक पूर्ण आहारामध्ये या भरडधान्यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. त्यात उच्च प्रथिनांची असलेली पातळी आणि अधिक संतुलित 'अमिनो अॅसिड' मुळे बाजरीसह इतर तृणधान्ये हे गहू आणि तांदुळापेक्षा पौष्टिकदृष्ट्या श्रेष्ठ आहेत. हवामानास अनुकूल असण्याबरोबरच बाजरीत अँटी-ऑक्सिडेटच्या गुणधर्मामुळे ती शरीराला खूप फायदेशीर असते. बाजरीच्या धान्यांमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, आहारातील फायबर आणि चांगल्या दर्जाचे स्निग्धांश यांसारख्या पोषक तत्त्वांचा समावेश असतो, आशिया खंडातील सुमारे ८० टक्के आणि जगातील एकूण देशांत होणाऱ्या भरड धान्यांच्या उत्पन्नापैकी २० टक्के भरडधान्य भारतात तयार होते.

भरडधान्ये म्हणजे काय? त्यामध्ये कोणत्या धान्यांचा समावेश होतो? भरडधान्य हे लहान बिया असलेल्या गवतांचा समूह आहे ज्यात भरपूर छोट्या बिया धान्य म्हणून कोरडवाहू क्षेत्रात त्यांची लागवड केली जाते, मुखत्वे यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, कुट्ठ आणि राजगिरा ही भरडधान्ये खाल्ली जातात.

भरडधान्यात कुठले पौष्टिक जीवनसत्त्व असतात, त्याचा शरीराला काय फायदा होतो?भरडधान्यांमध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, सेलिनियम, बीटा कॅरोटेन, मुबलक प्रमाणात आढळतात, ज्वारीमध्ये तांदळापेक्षा ८ पट जास्त फायबर, नाचणीमध्ये ४० पट जास्त कॅल्शियम आणि बाजरीमध्ये ८ पट जास्त लोह, ५ पट जास्त व्हिटॅमिन बी २ आणि फॉलिक अॅसिड असते. तसेच कमीत कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे मधुमेह रुग्णासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. सर्व भरडधान्य ग्लुटीनमुक्त असल्यामुळे सिलियाक आजार असलेल्या व्यक्तीसाठी प्राधान्य आहार आहे. भरडधान्य हे पोस्ट मेनॉपॉज, हृदयविकारांना टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये मेंदूच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. ज्वारीमध्ये ब्ल्यूबेरी आणि जास्त अँटिऑक्सिडंटस असतात जे आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी करतात.

आठवड्यातून किती वेळा भरडधान्य आणि त्यावर कोणती प्रक्रिया करून ते खायला हवे?आठवड्यातून ४-५ वेळा भिजवून, आंबवून, मोड आणून, इडली, डोसा, भाकरी, ढोकळा बनवून खाऊ शकता. 

भरडधान्याच्या सेवनाअभावी कोणते दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात? व्हिटॅमिन ए, लोह, यांची कमतरता तयार झाल्यामुळे स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये कुपोषणाची लक्षणे दिसू शकतात. आहारातील फायबरचे प्रमाण कमी झाल्यामुळे पचनक्रिया संबंधित आजाराची वाढ होऊ शकते

किती वर्षापासून आपल्याकडे ही भरडधान्य खाल्ले जातात?सिंधुघाटी सभ्यतेच्या काळात सर्वप्रथम खाण्यासाठी भरडधान्ये उगवण्यात आली.

भरड धान्यांचा आहारात अधिकाधिक समावेश करण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तराबरोबरच नागरिक कसा सहभाग देऊ शकतात?भरडधान्याचे महत्त्व आणि पौष्टिक मूल्य याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता आणणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी अगदी शालेय स्तरावरील अभ्यासक्रमात भरडधान्यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे.

अलीकडे नाचणी सत्वासारखी अनेक भरड धान्याची मूल्यवर्धित उत्पादने बाजारात आलेली दिसतात. याच्या वापरातून खरोखर आहारात भरडधान्याचा वापर होतो, असे म्हणता येईल का? दोन्हीत काय फरक असू शकेल याविषयी सांगा. मूल्यवर्धित उत्पादनात प्रेसेर्व्हटिव्हस, इमुल्सिफायर्स, स्टॅबिलायझर्स असतात जे शरीराला हानिकारक ठरू शकतात त्यामुळे घरी बनवलेलेच पदार्थ खाणे अधिक उपयुक्त ठरते.

भरड धान्यांच्या काही रेसिपीज सांगू शकाल का?भाकरी, इडली, डोसा, ढोकळा, उपमा, पुलाव, खिचडी, शिरा, चिला इत्यादी.

'मिलेट्स मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर खदार वली म्हणतात, 'आहारात जर भरड धान्यांसारख्या देशी अन्नाचा समावेश केला तर आधुनिक काळातील जीवनशैलीशी निगडित जसे की डायबेटीस, ब्लड प्रेशर, थायरॉइड, लठ्ठपणा अशा विविध आजारांवर मात करता येऊ शकते, याकडे आपण कसे पाहता?अर्थातच बदललेल्या उपभोग पद्धती व खाण्याच्या सवयी तसेच पाश्चिमात्य जीवनशैलीचा स्वीकार यामुळे स्त्रिया व लहान मुले यात व्हिटॅमिन ए, प्रथिने, लोह, आयोडाइन यांच्या कमतरतेमुळे कुपोषण दिसून येते. हे कुपोषण दूर करण्यासाठी आहारात भरडधान्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. त्यामुळे अगदी पोषक आहार पुरवठा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त फायबरयुक्त घटक असलेल्या धान्यांचा समावेश करण्यात आले आहे.

भरडधान्याबाबत तुम्ही काय संदेश द्याल?भरडधान्ये ही सर्वात प्राचीन पण आपण विसरलेले असे 'गोल्डन ग्रेन' म्हणून ओळखले जातात. भरडधान्याचा आपल्या आहारात समावेश करून निरोगी आयुष्याचा पाया रचणे आवश्यक आहे.

डॉ. अभिषेक माने आहारतज्ज्ञ 

टॅग्स :फळेशेतकरीबाजरीज्वारीनाचणीशेतीपीकअन्नआरोग्यआहार योजना