अवर्षण परिस्थिती, पाण्याचा ताण, हवामानातील बदल, जैविक निविष्ठांचा कमी वापर आणि रासायनिक कीटकनाशकांचा बेसुमार वापर या प्रमुख कारणांमुळे ऊस पिकामध्ये हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात.
प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन
१) मशागतीय पद्धती
◼️ उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी.
◼️ नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे वेचून रॉकेलमिश्रीत पाण्यात मिसळून त्यांचा नायनाट करावा.
◼️ पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
२) यांत्रिक पध्दती
◼️ झाडाच्या फांद्या हालवून खाली पडलेल्या भुगेन्याचा बंदोबस्त करावा.
◼️ प्रकाश सापळे वापरून प्रौढ भुंगेरे जमा करता येतात.
◼️ हे प्रकाश सापळे सर्व शेतकऱ्यांनी शेतामधील घर, झोपडी, विहीरीजवळ किंवा झाडावर लावावेत, सापळ्यात जमा झालेले भुंगेरे नष्ट करावेत. हे सापळे संध्याकाळी ७.३० ते ८.३० या कालावधीत लावावेत.
◼️ किटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात.
◼️ रात्रीला भुंगेरे फांद्यावरील पाने खाल्यामुळे मरुन जातील.
अळीचे व्यवस्थापन
◼️ पिकामध्ये शक्य असेल तोपर्यंत आंतरमशागत करावी.
◼️ निंदणी आणि कोळपणी ही आंतरमशागतीची कामे केल्यास हुमणीच्या अळ्या पृष्ठभागावर येतात.
◼️ या अळ्या पक्षी वेचून खातात किंवा सुर्यप्रकाशाच उष्णतेमुळे मरतात.
◼️ आंतरमशागत करतेवेळी शेतातील अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
◼️ खरिपातील पीक काढणीनंतर शेतामध्ये खोल नांगरट करावी व पाळी मारावी.
◼️ शेतामध्ये शक्य असल्यास वाहते पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील अळ्या काही प्रमाणात मरतात.
◼️ शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
◼️ मेटाऱ्हायझियम एनिसोप्ली या उपयुक्त बुरशीचा १० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा.
◼️ हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमीचा वापर करावा.
◼️ भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे.
◼️ तसेच यामुळे पुढील संक्रमण थांबविले जाते. सतत ३-४ वर्षे भुंगेरे गोळा करून मारावेत.
◼️ सामुदायिकरित्या भुंगेरे गोळा केल्यास हुमणी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते.
◼️ अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये.
◼️ पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी.
अधिक वाचा: सोयाबीन पेरणीसाठी बियाणे निवडताना उगवण क्षमता तपासणी का करावी? जाणून घ्या सविस्तर