lokmat Supervote 2024
Lokmat Agro >स्मार्ट शेती > बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

How to cultivate multipurpose summer mung green gram crop by improved method? | बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

बहुउपयोगी उन्हाळी मुगाची सुधारित पद्धतीने लागवड कशी करावी?

गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे.

गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मानवी आहाराच्या दृष्टीने मुगास विशेष महत्व आहे. मुगामध्ये २० ते २५ टक्के प्रथिने असतात आणि ही प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता यात वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार मुगाची मागणी फार मोठी आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील मुगाचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने मुग पिकाची लागवड करणे गरजेचे आहे.

कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचे असेल तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड, योग्य प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, बियाण्याचे प्रति हेक्टर पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा शिफारशीत प्रमाणात वापर, वेळेवर तण नियंत्रण, आवश्यकतेनुसार वेळेवर पाणीपुरवठा, रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण या बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे.

जमीन
उन्हाळी मुगासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पिक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींची वाढ होत नसल्यामुळे रोपे पिवळी पडतात आणि उत्पादनात घट येते. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते.

हवामान
या पिकास २१ ते २५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते. तसेच ३० ते ३५ अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो. परिणामी अधिक उत्पादन मिळते.

पूर्वमशागत
खरीप/रब्बी पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. जमिनीची खोल नांगरट नंतर २ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. उन्हाळी मुगास पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून रानबांधणी करावी. जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडाव्यात. दोन ओळीतील अंतर २२.५ ते ३० सें.मी. ठेवावे.

पेरणीची वेळ
उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करू नये अन्यथा पीक मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते.

पिककालावधी (दिवस)लागवडीची पद्धतहेक्टरी बियाणे (किलो)लागवड अंतर (सें.मी.)उन्हाळी हंगामासाठी शिफारस केलेले वाण
मुग६० ते ६५सरी वरंबा१५ ते २०२२.५ x १० किंवा ३० x १०वैभव, पुसा-९३५१, पुसा विशाल, एस एल एम-६६८, एच यु एम-१, पंत मुग-५, सम्राट (पी डी एम-१३९), मेहा (आय पी एम ९९-१२५), दुर्गा (आर एम जी २६८), जी ए एम-५

बियाण्याचे प्रमाण
पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रति हेक्टरी बियाण्याचे पुरेसे प्रमाण आणि योग्य वापर महत्वाचे ठरते.

बीजप्रक्रिया आणि जीवाणू संवर्धन
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी किंवा जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे. यानंतर जीवाणू संवर्धनामधे नत्र स्थिर करणारे रायझोबियम जापोनिकम व स्फुरद विरघळवणारे पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.

१० किलो बियाण्यास २५० ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. (गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.) बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे मुग पिकाच्या मुळावरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि त्यायोगे पिकाचे उत्पादन वाढते.

अधिक वाचा: उत्पादन वाढीसाठी उन्हाळी भुईमुगाची लागवड कशी कराल?

खते
चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रति हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे. यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते व अशा जमिनीत या पिकाची जोमदार वाढ होण्यास उपयोग होतो. पेरणी करताना मुग पिकास २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणात द्यावे.

आंतरमशागत
पीक सुरवातीपासूनच तण विरहीत ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्यक बाब आहे. कोळप्याच्या सहाय्याने पिक २० ते २५ दिवसाचे असताना पहिली व ३० ते ३५ दिवसांचे असताना दूसरी कोळपणी करावी. गरजेनुसार एक दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. पेरणीपूर्वी फल्युक्लोरालीन किंवा पेंडीमीथिलीन हे तणनाशक दीड लिटर प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यातून जमिनीवर फवारावे.

पाणी व्यवस्थापन
उन्हाळी मुगाकरिता वेळेवर पाण्याच्या पाळ्या देणे अतिशय महत्वाचे असते. उन्हाळी मुगाचा कालावधी उन्हाळ्यात येत असल्याने ओलिताच्या साधारणपणे ५ ते ६ पाळ्या द्याव्यात. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. यासाठी शेताची रानबांधणी व्यवस्थित करावी. या पिकाला फुले येताना आणि शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. तसेच पीक ५० दिवसाचे झाल्यानंतर पाणी तोडावे, जेणेकरून पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होईल.

काढणी, मळणी आणि साठवण
मुगाच्या शेंगा ७५ टक्के वाळल्यावर पहिली तोडणी व त्यानंतर ८ ते १० दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीच्या सहाय्याने झोडपून दाणे अलग करावेत. साठवणीपुर्वी मुग ४ ते ५ दिवस उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये. शक्य झाल्यास धान्यास १ टक्का करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे. यामुळे धान्य साठवणुकीतील किडींपासून मुगाचे संरक्षण होते.

उत्पादन
१० ते १२ क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळते.

डॉ. एस. डी. राजपूत, डॉ. दिपक दहात
तेलबिया संशोधन केंद्र, म. फु. कृ. वि., जळगाव

Web Title: How to cultivate multipurpose summer mung green gram crop by improved method?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.