Join us

सरकी ते कापूस कसा आहे कपाशीचा जीवनक्रम? जाणून घ्या सोप्या शब्दांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 12:13 IST

Life Cycle of Cotton Crop : कपाशी (कापूस) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग या पिकावर अवलंबून असतो.

कपाशी (कापूस) हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागांमध्ये कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग या पिकावर अवलंबून असतो.

कपाशी पिकाचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी योग्य नियोजन आणि या पिकाच्या जीवनक्रमाची माहिती असणे फारच गरजेचे आहे. कपाशीचा संपूर्ण जीवनक्रम साधारणतः १५० ते १८० दिवसांचा असतो आणि तो काही विशिष्ट टप्प्यांमध्ये विभागला जातो.

प्रत्येक टप्प्यावर योग्य ती देखभाल, कीडनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन केल्यास कापसाचे उत्पादन व उत्पन्न दोन्ही चांगले मिळते.

त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच स्थानिक हवामानाचा अंदाज, पाऊसमान आणि मातीची स्थिती लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळे पीक व्यवस्थापनाची योग्य वेळ राखता येते आणि अपेक्षित उत्पादन मिळवणे शक्य होते.

अंकुरण टप्पा (Germination Stage) – ५ ते १० दिवस

या टप्प्यात बियाणे पेरल्यानंतर मातीतील योग्य आर्द्रतेमुळे बीज अंकुरते. यासाठी उष्ण हवामान (२५ ते ३० अंश सेल्सियस) आणि ओलसर, भुसभुशीत माती आवश्यक असते. अनुकूल  परिस्थिती मिळाल्यानंतर बीज फुटते आणि त्यातून लहान रोप बाहेर येते. या अवस्थेत बियाणे प्रक्रिया केलेले असल्यास सुरुवातीच्या रोग आणि कीटकांपासून संरक्षण मिळते ज्यामुळे पीक निरोगी राहते आणि चांगली वाढ मिळते. 

बाल्यावस्था (Seedling Stage) – १० ते ३० दिवस

या अवस्थेत रोपाच्या मुळांची वाढ होते आणि झाडाची प्राथमिक पाने तयार होतात. झाड अजूनही नाजूक असल्यामुळे या काळात हवामानातील बदल, तणांचा त्रास आणि काही सुरुवातीच्या कीटकांचा धोका अधिक असतो. त्यामुळे तणनियंत्रण, कीडनियंत्रण आणि सुरुवातीचे खत व्यवस्थापन याकडे लक्ष देणे आवश्यक असते. या टप्प्यावर झाडाच्या मजबुतीची पायाभरणी होते.

वाढीचा टप्पा (Vegetative Stage) – ३० ते ६० दिवस

या टप्प्यात झाडाची उंची वाढते. तसेच नवीन शाखा आणि पाने विकसित होतात. झाडाची एकंदर वाढ जलद होते त्यामुळे पोषणद्रव्यांची गरजही अधिक असते. खत व्यवस्थापन ज्यात विशेषतः नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे संतुलित प्रमाणात वापर या टप्प्यात अत्यंत महत्त्वाचे असते. या टप्प्यात काही किडींचा प्रादुर्भाव होण्याची देखील शक्यता असते त्यामुळे वेळोवेळी निरीक्षण करणे गरजेचे आहे.

फूलधारण टप्पा (Square Formation and Flowering) – ६० ते ९० दिवस

झाडावर फुलांच्या कळ्या (स्क्वेअर) तयार होऊ लागतात आणि त्यानंतर फुले उमलतात. फुले सकाळी लवकर उमलतात आणि अल्पकाळ टिकतात. या काळात हवामान योग्य नसेल तर फुलगळ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हार्मोन स्प्रेचा वापर फायदेशीर ठरतो. फुलधारणेच्या टप्प्यावर सफेद माशी, थ्रिप्स आणि फुलकिडे यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कीटकनाशकांचा वापर आवश्यक असतो.

बोंडधारण व भराव टप्पा (Boll Formation and Development) – ९० ते १३० दिवस

फुलांनंतर झाडावर बोंडे तयार होऊ लागतात. सुरुवातीला ही बोंडे लहान आणि कोवळी असतात परंतु हळूहळू त्यांचा आकार वाढतो आणि त्यात कापसाचा भराव होऊ लागतो. या काळात गुलाबी बोंड अळीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे नियमित शेतात फेरफटका मारून निरीक्षण करणे आणि आवश्यकता भासल्यास नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचे असते.

बोंड फुटणे व कापसाची काढणी (Boll Opening and Harvesting) – १३० ते १८० दिवस

बोंडे पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर ती फुटून त्यातून पांढरट कापूस दिसू लागतो. ही स्थिती म्हणजे पीक काढणीस तयार झाले आहे. अशावेळी कापसाची काढणी हळूहळू टप्प्याटप्प्याने करावी लागते कारण सर्व बोंडे एकाच वेळी फुटत नाहीत. कापूस तोडणीसाठी हवामान कोरडे असावे. 

या विविध टप्प्यांवर कापूस पिकाचे योग्य आणि काटेकोर व्यवस्थापन केले गेले तर त्यातून नक्कीच चांगले उत्पादन मिळविता येते. 

हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल

टॅग्स :पीक व्यवस्थापनकापूसशेतीशेती क्षेत्रशेतकरीकीड व रोग नियंत्रणमराठवाडाविदर्भ