बऱ्याच भागात पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येते आहे, त्यामुळे उगवून आलेल्या सोयाबीन, कापूस यासारख्या पिकामध्ये तसेच फळ बागेमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राने केले आहे.
नियंत्रणात्मक उपाययोजना
- सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.
- गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे.
- शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.
- गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपई ची पाने बारीक करून ठेवावीत, त्याला आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात.
- लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रती १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.
- गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगायनाशकाचा वापर करावा.
- कापसासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.
- तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.
- शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. मेटाल्डिहाईड चा वापर, जास्त तापमान व कमी आर्द्रता असते अशावेळी जास्त प्रभावी दिसून येतो. जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.
- दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम २५ टक्के ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
- सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.
अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते.
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
दुरध्वनी क्रमांक 02452-229000
व्हॉटसअप हेल्पलाईन 8329432097
अधिक वाचा: कीड नियंत्रणासाठी बिनखर्चिक, नैसर्गिक आणि झटपट तयार होणारा उपाय; वाचा सविस्तर