Lokmat Agro >स्मार्ट शेती > Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

Ghonas Snake: How to take care of the breeding season of this highly poisonous snake which starts in winter | Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

Ghonas Snake : थंडीत सुरु होतो या अतिविषारी सापाच्या प्रजननाचा काळ कशी घ्याल काळजी

सध्या घोणस या अतिविषारी सर्पाच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात घोणस या विषारी जातीचे साप रस्त्यावर आढळून येतात.

सध्या घोणस या अतिविषारी सर्पाच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात घोणस या विषारी जातीचे साप रस्त्यावर आढळून येतात.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या घोणस या अतिविषारी सर्पाच्या प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरातही मोठ्या प्रमाणात घोणस या विषारी जातीचे साप रस्त्यावर आढळून येतात. सर्पदंशामुळे होणारे बहुतांश मृत्यू रुग्ण हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच होतात.

सर्पदंश हा शेतात काम करत असताना गंभीर पण टाळण्यासारखा अतिशय गंभीर अपघात आहे. वेळेत उपचार घेतल्यास सर्पदंशाचा रुग्ण वाचू शकतो. याबाबत सर्पदंशतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांच्याशी साधलेला हा संवाद.

१) सर्पदंशाकडे गांभीर्याने पाहणे तितके गरजेचे का आहे?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगामध्ये दरवर्षी ४५ ते ५४ लाख लोकांना सर्पदंश होतो व प्रत्यक्षात १८ ते २७ लाख लोकांना विषबाधा होते. आशिया व आफ्रिका खंडामध्ये सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. जगामध्ये दरवर्षी ८६ हजार ते १ लाख ३८ हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो आणि ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना कायमचे शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व येते. जगाच्या तुलनेत भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ निम्या म्हणजे २८ लाख लोकांना सर्पदंश होतो आणि ६० हजार लोकांचा सर्पदंशामुळे (जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, देशभरात सर्पदंशाच्या फक्त १० टक्के प्रकरणांची नोंद केली जाते.. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच सर्पदंशाची (निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसिज) दुर्लक्षित आजारांमध्ये गणना केली असून २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ५० टक्के वर आणण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण व देशभरातील वाढत्या सर्पदंशाच्या घटनांकडे पाहता यावर तातडीचे व प्रभावी उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे गरजेचे आहे.

२) अनेकदा सर्पदंश झाला की आपण घाबरून जातो मात्र विषारी सर्पाचा दंश झाला आहे, हे कसे ओळखावे.
उत्तर : भारतामध्ये २७० सापांच्या जाती आढळून येतात. त्यापैकी नाग (Naja- Naja), मण्यार (Common Krait), घोणस (Russell's Viper), फुरसे (Saw Scaled Viper) या चार जाती अतिविषारी आहेत. नाग व मन्यार मज्जासंस्थेवर (Neurotoxic) दुष्परिणाम करतात. उदा. नागाने दंश केल्यास रुग्णास चक्कर येणे, डोळ्यापुढे अंधारी येणे, बोलण्यास त्रास होणे, तोतरे बोलणे, थुंकी गिळण्यास त्रास होणे, श्वसनास त्रास होणे, फिट्स येणे, बेशुद्ध होणे, श्वसनकिया बंद पडून रुग्णाचा मृत्यू होणे ही सर्व लक्षणे काही मिनिटांपासून ३ ते ३ तासांपर्यंत येऊ शकतात. दंश झालेल्या ठिकाणी तात्काळ सूज येते आणि गँगरीन होण्याची शक्यता असते. मण्यार शक्यतो पहाटेच्या वेळेस १ ते ६ वाजेपर्यंत जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगाखाली आल्यामुळे गोधडीत किंवा कपड्यात येऊन दंश होण्याची शक्यता अधिक असते. नागाच्या विषापेक्षा मण्यारचे विष तीव्र किंवा जहाल असते. मण्यारचे विषदंत छोटे असल्याने दंशाच्या ठिकाणी व्रण दिसून येत नाहीत किंवा सूजही येत नाही. काही तासानंतर रुग्णास पोट दुखून उलटी होते. सांध्यात तीव्र वेदना होऊन दरदरून घाम फुटतो. ६ ते १२ तासानंतर श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध होतो. घोणस व फुरसे दंश केल्यास रक्ताभिसरण संस्थेवर (Vasculotoxic) दुष्परिणाम होतो. तीव्र वेदना होवून दंशाच्या ठिकाणी सूज येते व फोड येतात. रक्तदाब कमी होवून नाडीचे ठोके अनियमित होतात. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष निर्माण झाल्यामुळे रक्त पातळ होते व रुग्णास हिरड्यातून व तोंडावाटे, डोळ्यात रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या उलट्या होणे, लघवीतून आणि संडासवाटे रक्त जाणे अशी लक्षणे दिसून येतात. किडनी निकामी होते. फुरश्याच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. दंश झालेल्या जागी प्रथम जळजळ सुरू होवून नंतर ती संपूर्ण अवयवावर पसरते. दंश झालेल्या भागातून, लघवीतून व हिरडीतूनही रक्त पडते. त्यामुळे अशक्तपणा येतो. चापडाने (Bamboo pit viper) दंश केला त्या जागी काही मिनिटांत जळजळ होऊन दुखू लागते, सूज येते. रक्त पातळ होऊन उशिरा गोठते.

३) विषारी सर्पदंशानंतर प्रथमोचार काय करावेत?
उत्तर : सर्पदंश झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. त्याला प्रथम धीर द्यावा आणि उबदार ठेवावे, चालू किंवा पळू देऊ नये, त्याला स्थिर ठेवावे. सर्पदंश झाल्यावर प्रथम रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे. बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दोरीने करकचून बांधू नये. त्यामुळे गॅग्रीन होण्याची शक्यता असते. डॉक्टरांकडे गेल्यावर दंश झालेल्या व्यक्तीला दमा अथवा कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास प्रथम सांगावे. चावलेला साप शोधण्यासाठी व मारून डॉक्टरांकडे नेण्यासाठी अमूल्य वेळ दवडू नये.

४) सर्पदंशात कोणत्या वैद्यकीय तपासण्या आणि उपचार केले जातात?
उत्तर : लक्षणांवरून कोणता साप चावला आहे हे ओळखता येते. भारतात नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे या चारही विषारी सर्पदंशावर एकच लस उपलब्ध आहे. (Polyvalent ASV) सर्पदंशावरील लस घोड्याच्या रक्तापासून बनवलेली असल्यामुळे तिची रिअॅक्शन येऊ शकते. त्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. नाग किंवा मण्यार चावल्यास पहिल्या एक तासांत दहा आणि लक्षणाप्रमाणे पुढील सहा तासात अजून दहा अशी एकंदर वीस इंजेक्शन द्यावी लागतात. घोणस किंवा फुरसे चावल्यास रक्त गोठण्याच्या प्रक्रियेनुसार ३० से ४० इंजेक्शन लागतात. सर्पदंशाच्या लसीबरोबर इतर तातडीने उपचार उदा कृत्रिम श्वाच्छोच्छ्वास देणे, रक्तदाब व नाडीचे ठोके नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे देणे, रक्तस्त्राव होत असल्यास रक्त देणे, चपट्या पेशींचे प्रमाण कमी झाल्यास प्लेटलेट ट्रान्सफ्युजन आदि तातडीचे उपचार करावे लागतात. दंशाच्या ठिकाणी नेक्रोसिस किंवा गँगरीन झाल्यानंतर छोटीशी शस्त्रक्रिया करून त्वचारोपण करावे लागते. घोणस चावल्यास किडनी निकामी झाल्यास हिमोडायलिसिस करावे लागते.

५) आपण राबवत असलेला शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प काय आहे?
उत्तर : जुन्नर आंबेगाव तालुक्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार मिळू लागल्यामुळे अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. गेल्या अनेक वर्षात सर्पदंशामुळे एकही मृत्यू झालेला नाही. व्यापक प्रमाणात केलेली जनजागृती, डॉक्टरांसाठी व्याख्याने व वर्कशॉप आयोजित केल्यामुळे डॉक्टरही सर्पदंश झालेल्या रुग्णावर यशस्वी उपचार करू लागले आहेत. या मोहिमेंअतर्गत सर्पदंश होवू नये म्हणून व प्रथमोपचारासाठी जनजागृती करत असून, स्थानिक पातळीवर तातडीचे उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठीसुद्धा प्रयत्नरत आहोत. या प्रकल्पातून आशावर्कर्स, वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना सर्पदशाबाबतच्या उपचाराचे प्रशिक्षण मिळावे असा प्रयत्न करत आहोत.

Web Title: Ghonas Snake: How to take care of the breeding season of this highly poisonous snake which starts in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.