Join us

Earth Day अजूनही वेळ गेलेली नाही.. सावध ऐका पुढल्या हाका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:04 PM

आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय.

आज २२ एप्रिल. जागतिक वसुंधरा दिन. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? मागील १० वर्षांमध्ये पुण्याचे हिरवे आच्छादन ५० टक्के कमी झाल्याचं एका अहवालात पुढं आलं आहे. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय.

दिवसभर जिवाची काहिली होत आहे. एसी आणि कुलर बसवून हे प्रश्न सुटणार नाहीत. पाण्याचे प्रश्न आणखी बिकट होत चालले आहेत. हे सारे प्रश्न मनात गर्दी करत आहेत. आता वेळ आली आहे धरतीवर प्रेम करण्याची, जिने आपल्याला जन्म दिला आता वेळ आली आहे, सागरांना स्वच्छ करण्याची, हवेला शुद्ध करण्याची जरा लक्ष देऊन आपल्याच हृदयाचे स्पंदन ऐका एक नवीन सुरुवात करायला बळ मिळेल त्यातूनच एक ताकद जन्माला येईल... अजूनही वेळ गेलेली नाही आनंदोत्सव सुरू होईल आनंद उत्सव सुरू होईल!

कवीचं नाव आठवत नाही; परंतु ही कविता मनाला खूप भावली. "धरतीवर प्रेम करा,' हे सांगण्याची वेळ यावी हे खरे म्हणजे दुर्दैव आहे. ही धरती, पृथ्वी म्हणजे आपणा सर्वांचं घर आहे. त्यामुळे आपण ज्या घरात राहतो, त्या घराच्या सुरक्षिततेसाठी आपण अर्थातच सर्व काळजी घेतो. आपलं घर स्वच्छ राहावं, सुंदर राहावं म्हणून आपण प्रयत्न करतो. ते फक्त आपण स्वतः राहत असलेल्या घराबद्दल नव्हे, तर ही पृथ्वी आपणा सर्वांचे घर आहे, म्हणून तिची काळजी घ्यायला हवी.

पुणे तिथे काय उणे हे ऐकून माहिती होतं; पण 'पूर्ण तिथंही भयंकर उन्ह' हे मात्र या उन्हाळ्यात अनुभवणारे पुणेकर जागोजागी भेटत आहेत. प्रत्येक वर्षी वाढत जाणारं हे तापमान असह्य होत चाललंय, दिवसभर जिवाची काहिली होत चालली आहे. घराघरांत एसी आणि कुलर बसवून हे प्रश्न सुटणार नाहीत. तर उलट अजून क्लिष्ट बनणार आहेत, ग्रामीण भागातील पाण्याचे प्रश्न आणखीनच बिकट होत चालले आहेत.

जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सारे प्रश्न मनात गर्दी करत आहेत. दि. २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा होणारा दिवस. १९७० पासून तो साजरा होत आहे. या दिनानिमित्त काय करणार आहोत आपण? हा दिन साजरा करण्यासाठी आपली वसुंधरा आनंदी असायला हवी. आरोग्यदायी असायला हवी. तिच्या आजच्या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे, याचा आपण कधी विचार केला आहे? जवळच्या माणसांना आपण नेहमीच गृहीत धरतो, तसंच काहीसं या वसुंधरेबाबत, या धरतीबाबत झालं आहे.

म्हणजे आपण कसंही वागलो तरीही आहेच आपल्यासोबत हीआपल्याला देतच राहणार आहे आणि आपण घेतच राहणार आहोत, या भूमिकेतून आपण तिच्याशी अतिशय अन्याय करत आहोत हे आपल्या लक्षातही येत नाही. महात्मा गांधी म्हणाले होते, 'प्रत्येकाची भूक भागेल इतकं या पृथ्वीजवळ नक्कीच आहे; पण एखाद्याच्या हावरटपणावर तिच्याकडे उपाय नाही.' आपण इतके हावरट होत चाललो आहोत का की आपण निसर्गाकडून सारं काही ओरबाडून घेत आहोत?

आपण आवश्यकतेपेक्षा जास्त गरजा निर्माण केल्या आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी निसर्गातील साधनसंपत्ती आपण मालकी हक्काने हिसकावून घेत आलो आहोत. पृथ्वीच्या स्वतःच्या वजनापेक्षा अधिक पृथ्वीवरील मानवनिर्मित गोष्टींचं वजन झाल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

'प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक' ही या वर्षीच्या जागतिक वसुंधरा दिनाची थीम आहे. आपले दैनंदिन आयुष्य प्लास्टिकने कसे वेढून टाकले आहे, हे आपण पाहतच आहोत. प्लास्टिक किती हानिकारक आहे, त्यामुळे होणारे प्रदूषण हे अत्यंत घातक आहे, हे माहीत असूनही आपण प्लास्टिक टाळत नाही, ही अत्यंत टोकाची बेफिकीर वृत्ती परवडणारी नाही, हे आपल्या कधी लक्षात येणार? शालेय अभ्यासक्रमातून पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे, हे सांगितलं जात आहे.

परंतु, त्यापेक्षाही पर्यावरणावर म्हणजेच पृथ्वीवर, पृथ्वीवरील पशुपक्षी, प्राणी, झाडे, वेली या सर्वांवर प्रेम करायला मुलांना शिकवायला हवं. एखाद्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं तेव्हा आपण त्याची काळजी घेतो. त्याला जपतो. परिसरातल्या सर्व गोष्टींवर, सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीवर माझं मनापासून प्रेम आहे, असं मुलांना वाटायला हवं. एखादीच ग्रेटा थनबर्ग का बरं जन्माला यावी, जिने मोठ्यांच्याही डोळ्यांत अंजन घातलं आणि पर्यावरणाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

आपल्या वर्गावर्गात अशी ग्रेटा निर्माण व्हायला हवी. त्यासाठी परिसराचं, परिसराच्या माध्यमातून परिसराचं शिक्षण मुलांना देण्याची गरज आहे. तसंच पूर्ण वापर, पुनर्वापर, कधीही न वापरणे आणि जपून वापर या पर्यावरणाच्या चतुःसूत्रीचा अवलंब आपण करायला हवा. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला कायमच महत्त्वाचं स्थान दिलं आहे. मानवी जीवनाचं निसर्गासोबतचं नाते हे अगदी जवळचे होते.

आपल्या संविधानामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी विशिष्ट तरतुदी आहेत. १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये गाभाभूत घटकांमध्ये पर्यावरण संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समाविष्ट होता. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०'मध्येसुद्धा 'पर्यावरण संरक्षण' हा अंतर्विद्याशाखीय विषय म्हणून समाविष्ट केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरण शिक्षण हे प्रत्येक स्तरावर अनिवार्य करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३ मध्ये 'क्रॉस कटिंग थीम'मध्ये पर्यावरण शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे; परंतु फक्त धोरणांमध्ये हे विषय अडकून न पडता जनमानसापर्यंत हा विचार पोहोचणे गरजेचे आहे. आपले रोजचे जगणे हे पर्यावरणस्नेही होण्याची गरज आहे. त्यासाठी आपली प्रत्येक कृती डोळसपणे तपासून पाहावी.

आपले सण, धार्मिक कार्यक्रम, सार्वजनिक समारंभ, रोजच्या सवयी या सर्वांमध्ये पर्यावरणहित हे केंद्रस्थानी असायला हवे. आपण या प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासून, स्वताच्या घरापासून करायला हवी; तरच ही वसुंधरा सुंदर होईल आणि ही सुंदरता आपल्या जीवनाला सर्वार्थांनी लाभेल.

- डॉ. कमलादेवी आवटे क्षीरसागरउपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

टॅग्स :पृथ्वीतापमानहवामानपुणेपर्यावरणशिक्षणग्रेटा थनबर्गप्लॅस्टिक बंदी